नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उमेदवार उभे करणार असल्याचे भीम आर्मीचे अध्यक्ष चंद्रशेखर यांनी सांगितले. जर कोणताही उमेदवार मिळाला नाही तर मी स्वत: पंतप्रधानांच्या विरोधात उभा राहीन असेही त्यांनी सांगितले. 'न्यूज 18' ला दिलेल्या मुलाखतीत चंद्रशेखर यांनी ही माहीती दिली. चंद्रशेखर आणि भीम आर्मीतर्फे 15 मार्चला दिल्लीमध्ये सर्वात मोठे शक्तिप्रदर्शन होणार आहे. 15 मार्चला बहुजन हुंकार रॅली होणार असून तिथे जनतेचा आवाज देशाला ऐकायला मिळेल असेही चंद्रशेखर यांनी सांगितले. तुम्ही कितीही दाबण्याचा प्रयत्न केलात तरी हा आवाज आता दबणार नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
चंद्रशेखर यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरही यावेळी निशाणा साधला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या इशाऱ्यावरच देवबंद येथील आपली पदयात्रा रोखली गेल्याचा आरोप त्यांनी योगींवर केला आहे. आमच्याकडे या पदयात्रेची परवानगी होती. पण प्रशासन आणि सरकार याबद्दल अफवा पसरवत आहेत. बुधवारी पोलिसांनी कलम 144 अंतर्गत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर तब्येत ठिक नसल्याच्या तक्रारीवरून त्यांना मेरठ येथे आणण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत मायावती यांना पूर्ण पाठींबा देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच यावेळी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. आरक्षणाच्या मुद्द्यावर अखिलेश यांना त्यांची भूमिका स्पष्ट करायला हवी असे चंद्रशेखर यांनी यावेळी म्हटले. मुलायम सिंह यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर दिेलेल्या विधानावरही त्यांनी भाष्य केले. मुलायम सिंह हे आपल्या विधानांनी गोंधळ निर्माण करत असल्याचे ते चंद्रशेखर म्हणाले.