Dia Mirza on Mumbai air pollution: अभिनय क्षेत्रासमवेत पर्यावरण आणि सामाजिक कार्यामध्ये हिरीरिनं पुढाकार घेणाऱ्या कलाकारांच्या यादीत अभिनेत्री दिया मिर्झाच्याही नावाचा समावेश होतो. याच दिया मिर्झानं आता थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढेच आपली आणि शहरातील समस्त माता, भगिनी, नागरिकांच्या वतीनं एक व्यथा मांडली.
दियाची हतबलता तिनं लिहिलेल्या पोस्टमधून व्यक्त होत झाली. दियानं X च्या माध्यमातून लिहिलेल्या तिच्या सोशल मीडिया पोस्टला अनेक लाईक आणि रिशेअर मिळाले. तर, तिनं मांडलेल्या व्यथेशी सहमत होत परिस्थिती नेमकी किती गंभीर आहे याच मुद्द्याला नेटकऱ्यांनीसुद्धा दुजोरा दिला.
मुंबई शहरात गेल्या काही दिवसांपासून वायू प्रदूषणाची पातळी इतकी वाढली आहे की सामान्यांच्या आरोग्यावर याचा थेट परिणाम होताना दिसत आहे. याच मुद्द्याकडे दियानं आपल्या पोस्टच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं. तिनं लिहिलं, 'मुख्यमंत्री फडणवीसजी, मुंबई आणि महाराष्ट्रातील वायू प्रदूषणामुळं आमच्या मुलाबाळांच्या फुफ्फुसांवर आणि आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. मी एक आई म्हणून तुम्हाला विनंती आणि आवाहन करते की कृपा करून तातडीनं या मुद्द्यावर लक्ष द्या. ही एका पालकानं केलेली कळकळीची विनंती आहे..'
Sir, @Dev_Fadnavis the levels of #AirPollution in Mumbai and Maharashtra is continuing to cause irreversible damage to lungs and health of our children. I appeal to you as a mother to please address this matter with the empathy and urgency of a parent pic.twitter.com/xQIH0Nm8mb
— Dia Mirza (@deespeak) January 27, 2025
आपल्या या विनंतीपर आवाहनासोबत दियानं मुंबईचा एक नकाशाही जोडला. जिथं. शहरातील हवेचा गुणवत्ता निदेशांक अर्थात AQI किती घसरला आहे हे स्पष्ट पाहता येत आहे. दियाची ही पोस्ट सोशल मीडियामध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत असून, फक्त दियाच नव्हे, तर समस्त मुंबईकरांची हीच मागणी असल्याचं आता स्पष्ट होत आहे. यंत्रणा यावर आता काय निर्णय आणि कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.