मतदार यादीतून अखलाखच्या कुटुंबीयांची नावे गायब

अखलाखचे कुटुंबीय गुरुवारी मतदानासाठी केंद्रावर पोहोचले तेव्हा हा प्रकार समोर आला.

Updated: Apr 11, 2019, 05:06 PM IST
मतदार यादीतून अखलाखच्या कुटुंबीयांची नावे गायब title=

लखनऊ: गोमांस बाळगल्याच्या वादातून २०१५ साली जमावाकडून हत्या करण्यात आलेल्या अखलाख यांच्या कुटुंबीयांची नावे यंदा मतदार यादीतून गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. दादरी बिसहाडा गावात राहणाऱ्या अखलाख यांच्या कुटुंबातील एकाही सदस्याचे नाव मतदार यादीत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. याविषयी सरकारी अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी म्हटले की, अखलाख यांच्या घरात बऱ्याच महिन्यांपासून कोणाचेही वास्तव्य नाही. त्यामुळे मतदार यादीतून अखलाख यांच्या कुटुंबीयांची नावे वगळण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले. 

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला गुरुवारपासुन सुरुवात झाली. अखलाख यांचे दादरी बिसहाडा गाव उत्तर प्रदेशच्या गौतमबुद्धनगर मतदारसंघात येते. अखलाखचे कुटुंबीय गुरुवारी मतदानासाठी केंद्रावर पोहोचले तेव्हा हा प्रकार समोर आला. मात्र, ही घटना वगळता दुपारपर्यंत या मतदारसंघात शांततेत मतदान पार पडले. दुपारी एकपर्यंत येथे ६१ टक्के मतदान झाले.

२०१५ साली गोमांस बाळगल्याच्या संशयावरून जमावाने घरात शिरून अखलाख यांची हत्या केली होती. यावरून देशभरात मोठी खळबळ उडाली होती. या घटनेचे लोण देशाच्या अनेक भागांमध्ये पसरले होते. विरोधी पक्षांच्या दबावानंतर पोलिसांकडून १५ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. यानंतर स्थानिक नागरिकांच्या मागणीवरून अखलाख यांच्या कुटुंबीयांविरोधात गोहत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.