Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 400 पार आकडा न गाठता आलेल्या भाजपप्रणित एनडीएकडून आता पुढील हालचालींना वेग दिल्याचं पाहायला मिळत आहे. तिथं इंडिया आघाडीमध्ये बैठकांची सत्र सुरु असतानाच इथं शुक्रवारी NDA कडून सरकार स्थापन करण्याचा दावा केला जाणार असल्याचं समजत आहे. सकाळी 11 वाजता NDAच्या घटकपक्षांच्या संसदीय दलाची बैठक होणार असून, यामध्ये नरेंद्र मोदींच्या NDA चे नेते म्हणून निवड करण्यात येणार आहे.
या बैठकीत मोदींच्या नेतेपदाचा प्रस्ताव ठेवण्यात येईल आणि एकमताने त्यांची नेतेपदी निवड करण्यात येईल. यावेळी भाजप आणि NDAतील घटकपक्षांचे नेत्यांचीही उपस्थिती पाहायला मिळणार असून, अजित पवारांचीही या बैठकीला हजेरी असेल असं सांगितलं जात आहे. मोदींची (Pm Narendra Modi) नेतेपदी निवड झाल्यानंतर सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. पुढे सायंकाळी NDAचे नेते राष्ट्रपतींकडे जाऊन सरकार स्थापन करण्याचा दावा करतील.
शुक्रवार अनेक राजकीय घडामोडींचा दिवस ठरणार असून, भाजपची संसदीय दलाची महत्त्वाची बैठकही आज पार पडणार आहे. जिथं, खासदारांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वजण उपस्थित असतील. देशभरात जागा घटल्यामुळं या बैठकीत हा महत्त्वाचा मुद्दा ठरेल. यामध्ये प्रामुख्यानं उत्तर प्रदेशातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. खुद्द मोदी यामध्ये लक्ष घालणार असून, उत्तर प्रदेशच्या संघटनेत बदलांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासाठी यूपी भाजपचे सदस्य आणि सरकारच्या दिग्गजांना दिल्लीत बोलावण्यात आलं आहे. ज्यामुळं उत्तर प्रदेश भाजपमध्ये संघटनात्मक बदल जवळपास निश्चित दिसत आहेत. (UP Loksabha Eklction Results 2024)
इथं मोदींच्या निर्णयाकडे सर्वांच्या नजरा असतानाच चर्चेत असणारा आणखी एक मुद्दा म्हणजे एनडीए सरकारमधील मंत्रिमंडळाचं समीकरण. नव्या सूत्रानुसार एनडीएनं सरकार स्थापन केल्यास प्रत्येकी 4 खासदारांच्या मागे एक कॅबिनेट मंत्रिपद असं सूत्र ठरल्याचं समजत आहे. ज्यानुसार 4 महत्त्वाची खाती भाजप स्वत:कडे ठेवणार असून यामध्ये गृह, अर्थ , संरक्षण आणि परराष्ट्र खात्याचा समावेश आहे. सध्या रेल्वे,अर्थ आणि कृषी खात्यासाठी जेडीयू आग्रही असल्याचं समजतंय, त्यामुळे मंत्रिमंडळाच्या या सूत्रावर जेडीयू तसंच टीडीपी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.