Karnataka News : सध्या इंटरनेटच्या जगात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इंटरनेटमुळे लोक तासन्तास सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियावरच्या रिल्ससारखे स्वत:चे व्हिडिओ तयार करण्याची काहींना हौस असते. असाच एक प्रकार कर्नाटकमधल्या गडग इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. मात्र हे त्यांच्या अंगाशी आलं आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक इन्स्टाग्राम रिल तयार केली. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. पण विद्यार्थ्यांनी हा व्हिडीओ रुग्णालयाच्या आत तयार करण्याची मोठी चूक केली. रुग्णालयाच्या आतमध्ये अशा प्रकारचा व्हिडीओ तयार करणाऱ्या 38 विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
रुग्णालयाचे काही नियम असतात आणि या नियमांचं पालन करणे हे सगळ्यांचे कर्तव्य असतं. पण विद्यार्थ्यांनी या नियमांचे उल्लंघन केलं. या विद्यार्थ्यांवर रुग्णालयाच्या प्रशासनाने कारवाई केली आहे. या विद्यार्थ्यांची हाऊसमॅनशिप ट्रेनिंग दहा दिवस वाढविण्यात आली आहे.
गडद इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे प्रमुख डॉक्टर बसवराज बोम्मनहल्ली यांनी या प्रकरणाची माहिती दिली. रुग्णालयाच्या परिसरात 38 विद्यार्थ्यांनी एकत्र मिळून एक इंन्स्टाग्राम रिल तयार केली. या रीलमुळे रुग्णालयाच्या नियमांचे उल्लंघन झालं. या मुलांना जर रिल बनवायची होती तर त्यांनी रुग्णालयाच्या बाहेर बनवणं अपेक्षित होतं. रुग्णालयाच्या आतमध्ये रिल बनवण्यामुळे रुग्णांना त्याचा नाहक त्रास सहन होऊ शकतो आणि अशा प्रकारची कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही, अशी माहिती डॉ. बसवराज बोम्मनहल्ली यांनी दिली.
'रील इट, फील इट' अशी टॅगलाईन घेऊन विद्यार्थ्यांनी रुग्णांच्या बेडवर बसून रील बनवली होती. या रील्समध्ये विद्यार्थी रुग्णालयाच्या आवारात कधी नाचत तर कधी रुग्णाचा पलंग, स्टेथोस्कोप आदी उपकरणांचा वापर करताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांचे इन्स्टाग्राम पेज पाहिल्यावर रुग्णालयामध्ये वैद्यकीय गोष्टी शिकण्याऐवजी त्यांनी रील बनवण्यातच जास्त वेळ वाया घालवल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण आणखी दहा दिवस वाढवले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कर्नाटक मधील चित्रदुर्ग जिल्ह्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये एका ऑपरेशन थेअटरच्या आत प्री-वेडिंग फोटोशूट करण्यात आलं होतं. हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे एका डॉक्टरला काढण्यात आलं होतं. या व्हिडिओमुळे मोठ्या प्रमाणात टीका होत होती. हॉस्पिटलच्या ठिकाणी अशा प्रकारच्या व्हिडिओंचं कोणीही समर्थन करत नाही. डॉक्टर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांना या विषयावर कडक निर्देश देखील देण्यात आले आहेत. रुग्णालयात कोणत्याही प्रकारचे मनोरंजन करून इतरांचा वेळ आणि त्रास देऊ नये असे देखील राज्याचे स्वास्थ्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी सांगितलं होतं.