Maharashtra Political Crisis : जुलै महिन्याची सुरुवात महाराष्ट्राच्या राजकारणासाठी फारशी समाधानकारक राहिली नाही. राष्ट्रवादीत झालेल्या बंडामुळं (Sharad Pawar) शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा नव्यानं पक्षबांधणीची जबाबदारी आली. (Ajit Pawar Rebel) अजित पवार यांनी 8 आमदारांच्या साथीनं पक्षात बंड करत सत्ताधारी शिंदे- फडणीवस सरकारमध्ये प्रवेश केला. रविवारीच तडकाफडकी त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राष्ट्रवादीला हादला दिला.
पक्षात झालेल्या या बंडाळीनंतर शरद पवारांनी अतिशय संयमानं गोष्टी हाताळत बंडखोर आमदारांवर कारवाईचा बडगाई उगारला. तिथं पवार कराड दौऱ्यावर गेलेले असतानाच इथं (Mumbai) मुंबईत अजित पवार यांच्या निवासस्थानी बंडखोर गटाची पुढील रणनिती ठरवली जात होती. या बैठकीनंतर अजित पवार गटाकडून आपणच राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा करत जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवल्याचं जाहीर केलं. ज्यानंतर च्यांनी पाटील आणि आव्हाडांच्या अपात्रतेचा मुद्दा उचलून धरला.
तिथं पक्षासोबत केलेल्या या बंडामुळं राष्ट्रवादीकडून 9 आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई झाली. तर, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय शरद पवार गटाकडून घेण्यात आला. इतकंच नव्हे, तर अॅक्शन मोडमध्ये आलेल्या आणि पक्षातील बंडखोर वृत्तींना आळा घालू पाहणाऱ्या शरद पवार यांनी दिल्ली राष्ट्रवादीसंदर्भातही अतिशय मोठा निर्णय घेतला.
शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिल्ली राष्ट्रवादीसंदर्भातील त्यांचा निर्णय जाहीर करत सर्वांच्याच नजरा वळवल्या. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांना उद्देशून माहिती देत त्यांनी सोनिया दुहन या राष्ट्रवादीच्या दिल्ली कार्यालयाच्या प्रमुख असतील असं स्पष्ट केलं. सोनिया दुहन या विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा असून, त्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि शरद पवार यांच्या विश्वातील व्यक्तींपैकी एक आहेत. आपल्याला ही जबाबदारी मिळताच दुहन यांनीसुद्धा ट्विट करत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे आभार मानले. आपल्याला देण्यात आलेली जबाबदारी पार पाडत प्रचंड मेहनतीनं काम करु असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला.
It is hereby notified all public and office bearers of NCP that from today Ms. Sonia Doohan will be charge of Nationalist congress party, New Delhi central office.@DoohanSonia pic.twitter.com/qfl7zANwmG
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 3, 2023
दरम्यान, पवारांच्या या निर्णयानंतर दिल्ली राष्ट्रवादीत मोठी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. दुहन यांच्या हाती सूत्र जाताच राष्ट्रवादीच्या दिल्लीतील कार्यालयातून प्रफुल्ल पटेलांचा फोटो हटवण्यात आले. ज्यानंतर पटेल गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. दिल्लीतील कार्यालयावर प्रफुल्ल पटेल यांच्या गटानं दावाही केला. ज्यानंतर परिस्तिथी बिघडताना पाहून पोलिसांचा मोठा फौजफाटा राष्ट्रवादी कार्यालयात दाखल झाला. मात्र आपण या कार्यालयातून हटणार नाही, असा दावा राष्ट्रीय युवा अध्यक्ष सोनिया दुहान यांनी करत त्यासुद्धा आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळालं.