बंगळुरु : कर्नाटक विधानपरिषदेमध्ये ( Karnataka Legislative Council) आज जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. आज गोहत्या बंदी विधेयक सभागृहात सादर होणार होते. त्याआधीच काँग्रेस आमदारांनी उपसभापतींना त्यांच्या खुर्चीवरुन खाली खेचले (Deputy Chairman forcibly evicted from seat by Congress leaders) आणि एकच गोंधळात भर पडली. सभागृहाचे कामकाज सुरु होताच विधानपरिषदेतील काँग्रेस (Congress) आमदारांनी उपसभापती यांना जबरदस्तीने खुर्चीवरुन खेचून बाहेर काढले. यावेळी झालेल्या गोंधळामुळे मार्शल्सना हस्तक्षेप करावा लागला.
गोहत्या बंदी विधेयकाविरोधात काँग्रेसचे आमदार अधिक आक्रमक झाले होते. यावेळी या विधेयकावरुन उपमुख्यमंत्री अश्वथानारायण आणि काँग्रेस आमदारांमध्ये शाब्दीक चकमक झाली. काँग्रेसने विधानपरिषदेच्या सर्व आमदारांसाठी व्हीप जारी केला होता. गोहत्या बंदी विधेयकाविरोधात काँग्रेसला मतदान हवे होते. काँग्रेसला विधेयकाविरोधात मतदान करायचे होते. मंजुरीआधी जेडीएसला ते विधेयक सिलेक्ट समितीकडे पाठवायचे होते. यावरुन गोंधळ झाला.
काँग्रेस आमदार प्रकाश राठोड यांनी भाजपवर टीका केली. भाजप आणि जेडीएसने सभापती यांना बेकायदा पद्धतीने खुर्चीवर बसवले. भाजप, अशा असंवैधानिक पद्धतीने वागत आहे, हे दुर्देवी आहे. आम्ही त्यांना खुर्चीवरुन उतरायला सांगितले होते. पण ते बेकायदा तिथे बसले असल्याने त्यांना तेथून हटविले. दरम्यान, भाजपकडूनही काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. काही आमदार गुंडासारखे वागले. त्यांनी उपसभापतींना जबरदस्तीने खुर्चीवरुन खेचले. त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. हा लाजिरवाणा दिवस आहे, असे भाजपचे आमदार लेहर सिंह सिरोया म्हणाले.