Mehbooba Mufti Temple Visit: जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांनी मंदिरात भेट दिल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मेहबुबा मुफ्ती नुकतंच पुँछ (Poonch) येथील नवग्रह मंदिरात (Navgrah Temple) पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी शिवलिंगाचं दर्शन घेत त्यावर पाणी अर्पण केलं. यानंतर त्यांच्यावर भाजपा आणि मुस्लीम धर्मगुरु टीका करत आहेत. यानंतर मेहबुबा मुफ्ती यांनीही मुस्लीम धर्मगुरुंना उत्तर दिलं असून, आपल्याला आपला धर्म चांगला माहिती आहे असं सुनावलं आहे.
पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (PDP) प्रमुख मेहबुबा मुफ्ती दोन दिवसांच्या पुँछ जिल्ह्यावर होत्या. यावेळी त्यांनी नवग्रह मंदिराला भेट देत प्रार्थना केली. यावेळी त्यांनी शिवलिंगासमोरही डोकं टेकवलं.
भाजपाने मेहबुबा मुफ्ती यांच्या मंदिर दौऱ्यावर टीका केली असून हे एक नाटक आणि नौटंकी असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील देवबंदने मेहबुबा मुफ्ती यांनी जे केलं त्यासाठी इस्लाममध्ये परवानही नाही असं म्हटलं आहे.
इत्तेहाद उलेमा ए हिंदचे उपाध्यक्ष मुफ्ती असद कासमी यांनी सांगितलं आहे की, "मेहबुबा मुफ्ती असो किंवा इतर कोणी असो, प्रत्येकाला आपला धर्म काय सांगतो तसंच कोणत्या गोष्टींची परवानगी आहे आणि काय निषिद्ध आहे याची कल्पना आहे".
"हा भारत असून प्रत्येकाला आपल्याला जे हवं ते करण्याचं स्वातंत्र्य आहे. पण मेहबुबा मुफ्ती यांनी जे केलं ते अयोग्य असून, इस्लाम त्यासाठी परवानगी देत नाही. मेहबुबा मुफ्ती यांनी जे केलं आहे त्यामुळे धर्मातून त्यांना बाहेर काढलं जाईल असं नाही. पण त्यांनी इस्लामच्या मूल्यांच्या विरोधात केलं आहे," असं असद कासमी म्हणाले आहेत.
मेहबुबा मुफ्ती यांनी आपल्या मंदिर भेटीवर भाष्य करत टीकाकारांना उत्तर दिलं आहे. "आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. मी सर्व धर्मांचा आदर करते. आमचे दिवंगत नेते यशपाल शर्मा यांनी बांधलेल्या मंदिराला मी भेट दिली. हे एक सुंदर मंदिर आहे. कोणीतरी माझ्या हातात प्रेमाने पाण्याने भरलेला कलश सोपवला. मी त्याचा आदर केला आणि शिवलिंगावर जलाभिषेक केला," असं मेहबुबा मुफ्ती यांनी सांगितलं आहे.
"देवबंद मौलाना जे बोलले आहेत त्यावर मला भाष्य करायचं नाही. मला माझा धर्म चांगला माहिती आहे. ही माझी खासगी बाब आहे," असं मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या आहेत.