लखनऊ : काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी-वाड्रा यांच्या सोमवारच्या लखनौमधील रोड शो दरम्यान चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. या चोरट्यांनी सुमारे पंचवीसेक नेत्यांच्या मोबाईलवर डल्ला मारला. त्यांच्या खिशातले पैसेदेखील चोरले. काँग्रेस नेत्यांनी याप्रकरणी पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप करत पोलीस स्थानकात आंदोलन केलं. चोरीचा आळ घेत एक तरुणाला काही कार्यकर्त्यांनी मारहाणदेखील केली. प्रियंका गांधी-वाड्रा यांच्या १२ किलोमीटरच्या पदयात्रेत हजारो कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. याचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केले. मोबाईलसह अनेक कार्यकर्त्यांचे पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्सदेखील चोरीला गेले आहेत. उत्तर प्रदेशमधील चोरांच्या सुळसुळाटाला आवर घालण्याची मागणी कार्यकर्ते करत आहेत.
प्रियंका गांधींचा उत्तर प्रदेशातल्या लखनऊत सोमवारी रोड शो झाला. या रोड शोमधून प्रियंका गांधींचं राजकीय लॉन्चिंग करण्यात आलं. काँग्रेस सरचिटणीसपदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर प्रियंका गांधींचा हा पहिलाच रोड शो होता. या रोड शोमध्ये काँग्रेसनं जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. प्रियंका गांधी काँग्रेस कार्यकर्त्यांचं अभिवादन स्वीकारत होत्या. गर्दी फक्त प्रियंका गांधी यांच्यासाठीच आल्याची दिसत होती.
प्रियंका आणि राहुल गांधींच्या रोड शो दरम्यान विजेच्या तारा आडव्या आल्यानं काही काळ रोड शो थांबवावा लागला. या अडथळ्यामुळे प्रियंका आणि राहुल गांधी यांना बसमधून उतरावं लागलं. त्यानंतर छोट्या गाडीतून त्यांनी रोड शो पूर्ण केला.