कानपूर : कोरोनाचा धोका कमी होत नाही तोपर्यंत अर्ध्याहून अधिक देशांमध्ये मंकीपॉक्स आजाराने धुमाकूळ घातला आहे. जगभरात मंकीपॉक्सचे रुग्ण वाढत असल्याने टेन्शन आहे. अजूनतरी भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळला नाही. मात्र तरीही केंद्र सरकारने अलर्ट जारी केला.
मुंबईपाठोपाठ आता उत्तर प्रदेश सरकारनेही मंकीपॉक्ससाठी अलर्ट जारी केला. मंकीपॉक्सचा संसर्ग टाळण्यासाठी नव्या गाइडलाईन्स जारी केल्या आहेत.
जे मंकीपॉक्सचे संशयित रुग्ण आहेत त्यांनी आयसोलेशनमध्ये राहावं असं सांगितलं आहे. अशा लोकांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचीही चौकशी करणं आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय प्रवास किंवा दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांवर बारीक नजर ठेवण्याच्या सूचना योगी आदित्यनाथ यांनी दिल्या आहेत. मुंबई पाठोपाठ आता उत्तर प्रदेशही हाय अलर्टवर आहे.
आयसोलेशनमध्ये कधीपर्यंत राहावं?
सरकारने मंकीपॉक्सचा अलर्ट जारी केला. मंकीपॉक्सचा धोका टाळण्यासाठी गाइडलाईन्स जारी केल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मंकीपॉक्सचा संशय असलेल्या रुग्णांनी जोपर्यंत अंगावरचे रॅश किंवा पुरळं जात नाहीत तोपर्यंत आयसोलेशनमध्ये राहायला हवं.
रॅश किंवा पुरळ असलेल्या ठिकाणी नवीन त्वचा येईपर्यंत किंवा डॉक्टर आयसोलेशन संपवण्याचा सल्ला देत नाही तोपर्यंत त्यांनी वेगळं राहाणं गरजेचं आहे. राज्याच्या सर्व मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सरकारने पाठवलेल्या गाइडलाईन्समध्ये कोणत्याही रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची 21 दिवसांच्या कालावधीत चौकशी करावी असंही म्हटलं आहे.
अशा प्रकारे पसरतो आजार
असोसिएशन ऑफ इंटरनेशनल डॉक्टर्सचे महासचिव डॉ. अभिषेक शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार मंकीपॉक्स झालेल्या रुग्णांना ताप, चट्टे आणि लिम्फ नोड्समध्ये सूज येते. हा आजार श्वसनाद्वारेही पसरू शकतो.
मंकीपॉक्स झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने हा आजार वेगानं पसरतो असं सांगण्यात आलं आहे. 22 मे पर्यंत भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आला नाही. मात्र केंद्र आणि राज्य सरकार अलर्टवर आहे.
लक्षणं आणि अलर्ट
मंकीपॉक्स या आजाराची लक्षणं 2 ते 4 आठवड्यापर्यंत राहू शकतात. यूके, यूएस, युरोप, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण सापडले आहेत. हा आजार बरा होण्यासाठी 7 ते 14 दिवसांचा कालावधी लागतो. काही लोकांना तर 21 दिवसांपर्यंत कालावधी लागू शकतो.