Indian Railways News : भारतीय रेल्वेने स्वच्छतेला प्राधान्य दिल्यानंतर रेल्वेच्या डब्यात स्वच्छता दुत दिसत आहेत. मात्र, अनेक वेळा काही बोगीमध्ये सफाई केलेली दिसून येत नाही. त्यामुळे प्रवासी ट्विट करताना रेल्वे मंत्री तसेच रेल्वे मंत्रालयाला #हॅशटॅग करतात. किंवा मार्क करतात. मात्र, रेल्वे प्रवासादरम्यान, एका खासदाराला डास चापल्यानंतर रेल्वेच थांबविण्यात आली. तो डब्बा क्लिन केल्यानंतर रेल्वे पुन्हा धावू लागली.
उत्तर प्रदेशमध्ये डास चावल्याची एक रोचक घटना समोर आली आहे. इटाहचे खासदार राजवीर सिंह लखनऊच्या चारबाग रेल्वे स्थानकावरून दिल्लीला निघालेल्या गोमती एक्स्प्रेस (12419) या रेल्वेतून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान त्यांना डास चावला. खासदारांची तक्रार असल्याने संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली.
रेल्वे प्रवासादरम्यान खासदारासोबत प्रवास करणाऱ्या मान सिंह यांनी ट्विटरवर ट्रेनमध्ये डास चावल्याची तक्रार केली. खासदार राजवीर सिंह हे रेल्वेच्या पहिल्या एसी कोचमध्ये प्रवास करत आहेत. रेल्वेचे बाथरुम अस्वच्छ असून डास चावत आहेत. त्यामुळे खासदारांना बसणेही कठीण झाले आहे. ही तक्रार रेल्वे प्रशासनाकडे गेल्यानंतर तात्काळ जलद गतीने प्रशासन कामाला लागले. धावत धावत रेल्वेचे अधिकारी गाडीजवळ पोहोचले. त्यांनी रेल्वे थांबवली. गाडी थांबवल्यानंतर संपूर्ण बोगीमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. बोगीची साफसफाई झाल्यानंतरच गाडी तिथून पुढे रवाना करण्यात आली.
खासदारासोबत प्रवास करणाऱ्या मान सिंह यांच्या ट्विटनंतर अधिकारी तात्काळ कामाला लागले. त्यांनी रेल्वे उन्नाव येथे थांबवण्याचा निर्देश दिले आणि गाडी थांबली. यानंतर संपूर्ण डबा स्वच्छ करण्यात आला. डास दूर करण्यासाठी संपूर्ण बोगीवर फवारणी करण्यात आली. यानंतर उन्नाव रेल्वे स्थानकावरुन ट्रेन दिल्लीला रवाना करण्यात आली.
रेल्वेच्या या निर्णयाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. सामान्य माणसाला प्रवासादरम्यान अशा समस्यांशी सतत झगडावे लागत असले तरी त्याची साधी दखलही घेतली जात नाही. मात्र, तो तक्रार करत राहतो. पण एखाद्या नेत्याची अडचण झाली की, प्रशासन तत्काळ कारवाई करते. रेल्वेत प्रवास करताना लोक नेहमी तक्रार करतात की त्यांच्या तक्रारी ऐकून घेणारे कोणी नाही. कधी पाणीटंचाई, कधी घाण तर कधी उन्हाळ्यात पंखे खराब झाल्याच्या तक्रारी, अशा समस्यांनी प्रवासी नेहमीच त्रस्त असतात, असे प्रवासी सांगतात.