अवघ्या २०-२५ जागा लढवणारेही पंतप्रधानपदासाठी घुंगरू बांधून बसलेत- मोदी

यंदाची निवडणूक पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या साम्राज्याचा अंत करणारी ठरेल.

Updated: Apr 24, 2019, 10:28 PM IST
अवघ्या २०-२५ जागा लढवणारेही पंतप्रधानपदासाठी घुंगरू बांधून बसलेत- मोदी title=

कोलकाता: लोकसभेच्या केवळ २० ते २५ जागा लढवणाऱ्या पक्षाच्या नेत्यांनाही पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत आहेत. सर्वजण त्यासाठी पायात घुंगरू बांधून बसले आहेत, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला. ते बुधवारी पश्चिम बंगलाच्या बीरभूम येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांच्या महाआघाडीवर टीका केली. यावेळी त्यांनी म्हटले की, फक्त २० ते २५ जागा लढवणाऱ्या पक्षाच्या प्रमुखांनाही पंतप्रधान व्हायचे आहे. त्यासाठी सर्वजण घुंगरू बांधून तयार आहेत. यंदाची निवडणूक पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या साम्राज्याचा अंत करणारी ठरेल. जर ममता बॅनर्जी गुंडांना पाठबळ देणार असतील तर आम्ही लोकशाही आणखी सशक्त करू, असे मोदींनी सांगितले. 

तत्पूर्वी बुधवारी सकाळी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने नरेंद्र मोदी यांची अनौपचारिक मुलाखत घेतली. यावेळी मोदींनी ममता बॅनर्जी मला दरवर्षी कुर्ते आणि मिठाई पाठवत असल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याची बरीच चर्चाही झाली. मात्र, ममता बॅनर्जी यांनी लगेचच हुगळी येथील सभेत प्रत्युत्तर दिले होते. मी सणांच्यावेळी अनेकांना मिठाई आणि भेटवस्तू पाठवत असते. मोदींच्याबाबतीतही मी तेच केले. हे सगळे असले तरी मी मोदींना एकही मत देणार नाही, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.