अमृतसर : रावण दहनाच्या कार्यक्रमात झालेल्या मृत्यूच्या तांडवाला आता १८ तास उलटून गेलेत. पण अपघाताची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्यातच सगळ्या यंत्रणा धन्यता मानतायत. अपघातात आतापर्यंत ६१ जणांचा मृत्यू झाल्याचं अधिकृत सूत्रांनी म्हटलंय. तर सत्तरहून अधिक जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातानंतर नेहमीप्रमाणे पंजाबातही राजकारण तापू लागलंय. अमृतसरमध्ये मनावला आणि फिरोजपूर स्टेशन दरम्यान ही दुर्घटना घडली. पंजाबचे मंत्री नवज्योतसिंह सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर रावण दहनाच्या कार्यक्रमातील मुख्य पाहुण्या होत्या.
रावण दहनाच्या वेळी नवज्योत कौर मंचावर उपस्थिती होत्या. दुर्घटना घडल्यावर मात्र त्या घटनास्थळावरून तातडीनं निघून गेल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला.
Amritsar train accident video pic.twitter.com/hb9Q3f9qL6
— Satinder pal singh (@SATINDER_13) October 19, 2018
त्यावर स्पष्टीकरण देताना आरोप चुकीचे असल्याचा दावा कौर यांनी केलाय. 'ही दुर्घटना कशी घडली हे कुणालाच कळलं नाही... सर्व लोक उत्सव साजरा करत होते आणि रेल्वे रुळावरूनच सेल्फी काढत होते...' असं त्यांनी म्हटलंय.
एकूण सहा ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि सगळीच ठिकाणं रेल्वे रुळांना लागून होती, असा त्यांचा दावा आहे. उलट रेल्वे प्रशासनानं योग्य ती काळजी घेतली नाही, असा आरोप नवज्योत कौर यांनी केलाय.
आज सकाळी पंजाबमध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी जखमींची रुग्णालयात जाऊन चौकशी केली. दरम्यान याप्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.