Corona Cases India: साधारण तीन वर्षांपूर्वी याच काळात देशात कोरोना विषाणूनं हाहाकार माजवण्यास सुरुवात केली आणि परिस्थिती इतकी बिघडली की देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला. नागरिकांच्या आयुष्यावर याचे थेट परिणामही झाले. आता कुठे ही परिस्थिती नियंत्रणात आलीये, असं वाटत असतानाच पुन्हा एकदा घडी विस्कटली आणि कोरोना संसर्गानं डोकं वर काढलं. देशभरात सध्या पुन्हा एकदा कोरोना संसर्ग फोफावताना दिसत असून, मागील 114 दिवसांमध्ये पहिल्यांदाच 500 नवे कोरोना रुग्ण आढळल्यामुळं एकच खळबळ माजली आहे. कोरोनामुळं मृत्यू होणाऱ्यांचा आकडा अद्यापही नियंत्रणाबाहेर गेला नसला तरीही ही बाब अतिशय चिंतेची ठरत आहे.
शनिवारी देशात कोरोनाचे 524 नवे रुग्ण आढळले. मागील वर्षी 18 नोव्हेंबरनंतर समोर आलेला हा रुग्णसंख्यावाढीचा सर्वात मोठा आकडा ठरला आहे. गेल्या सात दिवसांचा आढावा घ्यायचा झाल्यास तब्बल 2671 नवे कोरोना रुग्ण आढळले. मागील चार आठवड्यांपासून देशात कोरोना रुग्णसंख्या सातत्यानं वाढत चालली आहे. ज्यामुळं आरोग्य यंत्रणाही सतर्कतेची पावलं उचलताना दिसत आहे.
महाराष्ट्रात 86 टक्के, तामिळनाडूमध्ये 67 टक्के आणि तेलंगाणामध्ये 63 टक्के रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. देशातील इतरही राज्यांमध्ये रुग्णसंख्यावाढीला आलेख उंचावताना दिसत आहे. राजधानी दिल्लीसुद्धा यात मागे राहिलेली नाही. किंबहुना येत्या काळातही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती वर्तवली जात आहे. गेल्या सात दिवसांची आकडेवारी पाहिल्यास कर्नाटक (584), केरळ (520) आणि महाराष्ट्र (512) इतक्या रुग्णांची नोंद झाली. थोडक्यात या राज्यांमध्ये रुग्णसंथ्या चौपट वाढल्यामुळं येत्या काळात पुन्हा एकदा कठोर नियमांचं पालन करण्याची वेळ येणार का हाच प्रश्न विचारला जात आहे.
देशातील एकूण आकडेवारीविषयी सांगावं तर, आतापर्यंत भारतातील तब्बल 4.46 कोटी (4,46,90,492) नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची अधिकृत आकडेवारी समोर आली आहे. कोविडमधून सावरलेल्यांचं प्रमाण 98.80 टक्क्यांवर पोहोचला असून, मृत्यूदर 1.19 टक्के इतका आहे.