बंगळुरु : भाजप नेते बी.एस येडियुरप्पा ( B.S Yediyurappa ) यांनी काल कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री ( Karnataka New CM ) कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आज संध्याकाळी कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी भाजपचा नवा चेहरा जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. कर्नाटकसाठी भाजपने धर्मेंद्र प्रधान ( Dharmendra pradhan ) आणि जी किशन रेड्डी यांना जबाबदारी दिली आहे. या नेत्यांसह विधिमंडळ पक्षाची बैठक झाल्यानंतर नवीन मुख्यमंत्र्यांची घोषणा केली जाईल.
सोमवारच्या घडामोडीनंतर आता येडियुरप्पाच्या वारसाच्या निवडीकडे लक्ष लागले आहे. पुढील मुख्यमंत्री कोण असेल याबद्दल अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. केंद्रीय मंत्री प्रहलाद जोशी, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवी, राष्ट्रीय संघटन सचिव बी. एल. संतोष आणि विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी ही नावे येडियुरप्पा यांच्या संभाव्य उत्तराधिकारी म्हणून चर्चेत आहेत.
गृहमंत्री बसवराज एस बोम्मई, महसूलमंत्री आर अशोक आणि उपमुख्यमंत्री सी.एन. अश्वथ नारायण यांची नावेही चर्चेत आहेत.
दक्षिण भारतात भाजपचे पहिले सरकार स्थापन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या येडियुरप्पा यांनी चार वेळा राज्याचे नेतृत्व केले. ते म्हणाले की ते राजकारणात शंभर टक्के राहतील आणि उद्यापासून भाजपला पुन्हा सत्तेत आणण्याचे काम करतील. येडियुरप्पा यांनी काल पत्रकारांना सांगितले की, "मी दोन महिन्यांपूर्वी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. आज आमचे सरकार दोन वर्षे पूर्ण करीत आहे. मला आता राजीनामा देणे योग्य वाटले आणि राज्यपालांना राजीनामा सादर केला आणि त्यांनी तो मान्य केला."
ते म्हणाले की, "पक्षाने मला इतक्या उंचीवर आणले आहे, कदाचित देशातील इतर कोणत्याही राजकारण्याला बा बहुमान मिळाला नसावा."
त्यांना राज्यपालपदाची ऑफर मिळाल्यास आपण ते मान्य करणार का असे विचारले असता ते म्हणाले, "अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी मला केंद्रीय मंत्री होण्याची ऑफर दिली होती, तेव्हा मी नाही म्हणालो." येडियुरप्पा म्हणाले, "राज्यपाल होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कर्नाटकात संघटना बळकट करण्यासाठी मी काम करेन. मी कोणतेही पद मागितलेले नाही आणि ते स्वीकारणार नाही." एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, "पुढचे मुख्यमंत्री कोण असावेत याचा मी कोणताही प्रस्ताव मांडणार नाही, हा निर्णय हायकमांडचा आहे. त्यांनी निवडलेल्य़ा व्यक्तीसोबत मी एकत्र काम करेन.'