नवी दिल्ली : सौदी अरेबियाचे हज आणि उमराहचे मंत्री डॉ. मुहम्मद सालेह बिन ताहेर बेन्तेन यांनी सोमवारी केंद्रीय अल्पसंख्यांक कार्यमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांना फोन केला. कोरोना संसर्गामुळे या वेळी भारतातून हज यात्रेसाठी यात्रेकरूंना न पाठविण्याची विनंती त्यांनी केली आहे.
सौदी अरेबियाच्या विनंतीनंतर नकवी म्हणाले की, कोरोनाच्या गंभीर आव्हानांमुळे संपूर्ण जग प्रभावित झाले आहे, त्याचा परिणाम सौदी अरेबियामध्येही दिसून येत आहे. अशा परिस्थितीत भारतीय मुस्लीम लोकांच्या हिताला प्राधान्य देत आणि सौदी अरेबिया सरकारच्या निर्णयाचा आदर ठेवत हजसाठी यंदा यात्रेकरुंना सौदी अरेबियाला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतातील मुसलमान हज 2020 साठी सौदी अरेबियाला जाणार नाहीत
कोणतेही शुल्क न कापता अर्जदारांनी जमा केलेली रक्कम तातडीने परत करण्याची प्रक्रिया सुरु; ऑनलाईन डीबीटी पद्धतीने अर्जदारांच्या बँक खात्यात पैसे होणार जमा : केंद्रीय मंत्री @naqvimukhtar
https://t.co/Hurmo9EArP pic.twitter.com/21ZHIS0kfz
— PIB in Maharashtra (@PIBMumbai) June 23, 2020
हज यात्रेसाठी आतापर्यंत २ लाख १३ हजार अर्ज आले होते, असेही नकवी म्हणाले. सर्व अर्जदारांनी जमा केलेली रक्कम परत करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. हे पैसे अर्जदारांच्या खात्यावर ऑनलाईन पाठविले जाणार आहेत.
२०१९ मध्ये, २ लाख भारतीय मुस्लीम हज यात्रेला गेले होते, ज्यात ५० टक्के महिलांचा समावेश होता.
यावर्षीही २३०० हून अधिक मुस्लीम महिलांनी "मेहरम" (पुरुष नातेवाईक) न घेता हजसाठी अर्ज केला होता. या महिलांना हज २०२१ मध्ये याच अर्जाच्या आधारे हज यात्रेवर पाठवले जाईल, तसेच पुढच्या वर्षी मेहरामशिवाय हज यात्रेसाठी अर्ज करणारऱ्या महिलांनाही हज यात्रेवर पाठवले जाईल. अशी माहिती त्यांनी दिली.
मोदी सरकारने २०१८ मध्ये सुरु केलेल्या मेहरम महिलांना हजला पाठवण्याच्या प्रक्रियेतून आतापर्यंत ३०४० महिलांनी हज यात्रा केली आहे.