नवी दिल्ली : लडाखमध्ये चीनच्या सीमेवरचा तणाव लक्षात घेता लॉकडाऊनमध्ये तैनात देशांतर्गत आयटीबीपीच्या जवानांना आता एलएसीवर पाठवण्यात येणार आहे. गृह मंत्रालय लवकरच या संदर्भात निर्णय घेऊ शकतो. सूत्रांच्या माहितीनुसार, आयटीबीपीच्या ३५ कंपन्या देशात सुरक्षा आणि कोरोना साथीच्या संबंधित विविध कामांमध्ये तैनात आहेत.
एलएसीवर आयटीबीपीच्या जवानांची संख्या वाढण्याबरोबरच सीमेवर अधिक दक्षता वाढविण्याची तयारीही सुरु आहे. यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये अंतर्गत सुरक्षेसाठी तैनात असलेल्या १५ कंपन्या लडाखला पाठवण्यात आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार आता अंतर्गत सुरक्षेत गुंतलेल्या एकूण ५० आयटीबीपी कंपन्या एलएसीकडे पाठवल्या जातील.
दरम्यान, लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे मंगळवारी दोन दिवसांच्या लेह दौर्यावर आहेत. तेथे ते एलएसीच्या परिस्थितीचा आढावा घेतील. यासह हिंसक झडपमध्ये जखमी सैनिकांची भेट घेतील. सूत्रांच्या माहितीनुसार सोमवारी मोल्डो येथे झालेल्या दोन देशातील लष्करी कमांडर्स यांच्यात झालेल्या 11 तासांच्या चर्चेत तणाव कमी करण्यावर सहमती दर्शविली गेली, परंतु तणाव कमी करण्यासाठी सध्याच्या परिस्थितीपासून दोन्ही देशांचे सैन्य कसे मागे हटेल, यावर मात्र मार्ग अद्याप सापडलेला नाही. एलएसीवरुन शस्त्र आणि सैन्य उपकरणे मागे घेण्यावर सहमती दर्शवली गेली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, चीनच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी आयटीबीपीच्या जवानांनी अनेक ठिकाणी एलआरपी (लाँग रेंज पेट्रोलिंग) आणि एसआरपी (शॉर्ट रेंज पेट्रोलिंग) ची संख्या वाढविली आहे. सीमेवर चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. भारत-चीन सीमेवर नजर ठेवण्याची जबाबदारी आयटीबीपीकडे आहे.
गलवानमध्ये चीनकडून झालेला घात आणि हल्ला यामध्ये 20 भारतीय सैनिक शहीद झाले. यानंतर उत्तराखंड, हिमाचल, अरुणाचल आणि लडाखमधील भारत-चीन सीमेवर असलेल्या 180 हून अधिक सीमा चौक्यांना सतर्क करण्यात आले आहे. याआधी आयटीबीपीने लडाखमधील सीमा चौकीवर 1500 अतिरिक्त जवान तैनात केले होते.