वाराणसी : निवेदन देऊन ६ महिने झाले तरी रस्ता झाला नाही. त्यामुळे उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्र्याने स्वत:च रस्त्यासाठी हातात फावडे घेतले आणि कामाला सुरुवात केली. विकासकामांना प्राधान्य देणार असल्याची घोषणा केली. मात्र, प्रत्यक्षात काम होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच योगी सरकारवर टीका होत.
योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी आपल्याच सरकावर नाराजी व्यक्त केली आहे. ओमप्रकाश हे सुहेलदेव भारतीय समाज पार्टीच अध्यक्ष आहेत. मंत्री ओमप्रकाश राजभर यांचे पैतृक गाव वाराणसीच्या फतेहपूरचे आहे. राजभर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मंत्री डोक्याला फेटाबांधून हातात फावडे घेतले आहे. ते आपल्या सहकाऱ्यांसोबत रस्त्याचे काम करत आहेत.
रविवारी २४ जून रोजी ओमप्रकाश राजभर यांचा मुलगा डॉ. अरविंद राजभर यांच्या विवाहाचे रिसेप्शन आहे. त्यामुळे अनेक पाहुण्यांचे या रस्त्यावरुन जाणे-येणे होणार आहे. या समारंभाला भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासहीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री, राजकीय नेते येण्याची शक्यता आहे.
राजभर यांनी दावा केला आहे की, या रस्त्याच्या कामाबाबत आपण ६ महिन्यांपूर्वी निवेदन दिले होते. मात्र, या निवेदनावर अद्याप कारवाई झालेली नाही. मंत्री असूनही या रस्त्याचे काम न झाल्याने स्वत: राजभर यांनी हातात कुदळ-पावडे घेत रस्ता कामाला सुरुवात केली. राजभर हे योगी सरकार आणि भाजपला वेळोवेळी विरोध करत असल्याने ते चर्चेत आहेत.