नवी दिल्ली : कांद्यांची साठेबाजी करत बाजारात कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या साठेबाजांना आता चांगलाच चाप लागणार आहे. कांद्यांच्या सततच्या वाढत्या किमती विचारात घेऊन व्यापाऱ्यांना कांदा साठविण्याची मर्यादा ठरवून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
देशभरात कांद्याच्या दरात अचानक झालेली वाढ विचारात घेऊन सरकार ही पावले टाकत आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारांनाही हे निर्देश दिले गेले आहेत. केंद्रीय मंत्रालयाकडून २५ ऑगस्टलाच याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
दरम्यान, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने म्हटले आहे की, कांद्यांची साठेबाजी करणाऱ्यांवर सरकार मोठी कारवाई करू शकते. संपूर्ण देशातच कांद्यांच्या दराने उचल खाल्ली आहे. कांदा महाराष्ट्रात सुमारे ३० ते ३५ रूपये प्रती किलोने विकला जात आहे. तर, चेन्नही ३१, दिल्ली ३८, कोलकाता ४० रूपये प्रति किलो अशा दराने विकला जात आहे.