Parents Killed 21 Year Old Girl As They Found Pregnancy Test Kit With Her: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) कौशाम्बीमध्ये एका 21 वर्षीय तरुणीची तिच्याच पालकांनी हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आई-वडिलांनी या तरुणीची गळा दाबून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे या मुलीकडे प्रेग्नसी टेस्ट किट सापडल्याने ही हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणीकडे प्रेग्नसी टेस्ट किट सापडल्याने तिचं बाहेर अफेर आहे असं तिच्या पालकांना वाटलं.
प्रेग्नसी टेस्ट किट सापडल्याच्या रागातून या तरुणीच्या तिच्याच आई वडिलांनी नातेवाईकांच्या मदतीने मुलीची हत्या केली. त्यानंतर या मृतदेहाची ओळख मिटवण्यासाठी चेहऱ्यावर अॅसिड टाकून चेहरा ओळखू येणार याची खात्री करुन घेत मृतदेह फेकून दिला. उत्तर प्रदेश पोलिसांनी या गुन्ह्यासंदर्भातील माहिती दिली आहे. या प्रकरणामध्ये तरुणीचे पालक आणि दोन नातेवाईकांना पोलिसांनी अटक केली आहे.
कौशाम्बीमधील तेन शाह अलमाबाद गावातील रहिवाशी असलेल्या नरेशने 3 फेब्रुवारी रोजी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली. यानंतर मंगळवारी या मुलीचा मृतदेह गावाच्या बाहेरील नाल्याजवळ छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळून आला. पोलीस अधिक्षक बृजेश कुमार श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाच्या तपासादरम्यान नरेश आणि त्याची पत्नी शोभा देवी या दोघांनी 3 फेब्रुवारी रोजी आपल्या राहत्या घरात गळा दाबून मुलीची हत्या केली.
मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून या तरुणीच्या चेहऱ्यावर आणि मृतदेहावर कारच्या बॅटरीमधील अॅसिड टाकण्यात आलं. या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नरेशचे भाऊ म्हणजेच मृत तरुणीच्या चुलत्यांनीही मदत केली. नरेशने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार त्याची मुलगी अनेक मुलांशी फोनवरुन बोलायची. "या तरुणीकडे प्रेग्नसी किटही सापडले होते. त्यामुळे आपल्या मुलीचे एखाद्या मुलाशी शरीरसंबंध असल्याचा संशय नरेशला आला. त्यामुळेच नरेश नाराज होता," असं अधिक्षक श्रीवास्तव यांनी सांगितलं. याच रागातून या तरुणीची हत्या करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.