नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून देशभरातील अनेक बँकांमधील गैरव्यवहार उघड झालेत. या पार्श्वभूमीवर या बँक घोटाळ्यांवर भाष्य करण्यासाठी संसदीय समितीने रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांना समन्स बजावलेय. येत्या १७ मे रोजी यासंबंधी प्रश्नांवर त्यांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते विरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखालील अर्थ खात्याच्या स्थायी समितीने मंगळवारी अर्थविषयक सेवा विभागाचे सचिव राजीवकुमार यांच्यासोबत चर्चा केली. यानंतर पटेल यांना समन्स बजावण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, देशातल्या पाच राज्यात निर्माण झालेल्या रोखीच्या तुटवड्याची दखल घेतली असून तुटवडा दूर करण्यासाठी तातडीनं पावलं उचलली असल्याचा दावा अर्थमंत्री अरूण जेटलींनी केलाय. सणासुदीच्या पूर्वसंध्येला झालेल्या रोखीच्या तुटवड्यानं पाच राज्यात एटीएमध्ये खडख़डटात झालाय. त्यामुळे नागरिक हैराण आहेत.
यात प्रामुख्यानं तेलंगणा, आंध्रप्रदेश, विदर्भाचा काही भाग आणि गुजरातमध्ये रोखीनं व्यवहार करणं कठीण झालंय. सलगच्या सुट्ट्यांमुळे ही समस्या निर्माण झाल्याचं म्हटलं जात होतं. पण प्रत्यक्ष तपास केल्यावर व्यवहाराता पुरेसं चलन असल्याचं पुढे आलंय. त्यामुळे रोकड नेमकी कुठे आहे. लोकांनी पुन्हा एकदा नोटा साठवायला सुरूवात केलीय की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.