Mental Illness: मानसिक आजारांबाबत अजूनही आपल्या समाजात म्हणावी तशी जनजागृती झालेली नाही. अशातच नुकत्यात झालेल्या एका संशोधनानुसार, मानसिक आरोग्यासंदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. आयआयटी जोधपूरने नुकतंच एक सर्व्हेक्षण केलं आहे. या सर्व्हेक्षणानुसार, भारतात केवळ एक टक्का लोक त्यांच्या मानसिक आजारांबद्दल माहिती देतात. म्हणजे देशात केवळ 1 टक्के लोक मानसिक आजारावर पुढे येऊन उपचार घेतात.
हा अभ्यास करण्यासाठी, 2017-2018 च्या राष्ट्रीय सॅम्पल सर्वेक्षणाच्या 75 व्या फेरीतील डेटा वापरण्यात आला. हे सर्वेक्षण पूर्णपणे लोकांच्या सेल्फ रिपोर्टिंगवर आधारित होतं. यावेळी सर्वेक्षणासाठी एकूण 5,55,115 व्यक्तींचा डेटा गोळा करण्यात आला. त्यापैकी 3,25,232 लोक ग्रामीण भागातील आणि 2,29,232 लोक शहरी भागातील होते. सर्वेक्षणासाठी 8,077 गावे आणि 6,181 शहरी भागांमधून सहभागींची निवड करण्यात आली. मानसिक आजाराशी संबंधित 283 रुग्ण ओपीडीमध्ये तर 374 रुग्ण रुग्णालयात दाखल होते.
या स्टडीनुसार, कमी उत्पन्न गटातील लोकांपेक्षा उच्च उत्पन्न गटातील लोकांमध्ये म्हणजेच श्रीमंत लोकांमध्ये आरोग्य समस्यांची तक्रार होण्याची शक्यता 1.73 पटीने जास्त असल्याचं दिसून आलं होतं. हा अभ्यास 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ मेंटल हेल्थ सिस्टिम्स'मध्ये पब्लिश झाला आहे.
हा अभ्यास IIT जोधपूरचे सहाय्यक प्राध्यापक, स्कूल ऑफ लिबरल आर्ट्सचे डॉ. आलोक रंजन आणि डॉ. ज्वेल क्रेस्टा, स्कूल ऑफ हेल्थ अँड रिहॅबिलिटेशन सायन्सेस, ओहायो स्टेट युनिव्हर्सिटी, कोलंबस, युनायटेड स्टेट्स यांनी संयुक्तपणे केलंय.
आयआयटी जोधपूरच्या या अभ्यासातून असंही समोर आलंय की, देशातील स्वतःहून आजारासाठी पुढे येणाऱ्या रुग्णांची संख्या खूपच कमी असल्याचं दिसून आलं. शिवाय यामध्ये मानसिक आजारांचं सेल्फ रिपोर्टिंग भारतातील सर्वात श्रीमंत लोकसंख्येच्या उत्पन्न गटामध्ये सर्वात गरीब लोकांच्या तुलनेत 1.73 पट जास्त आहे. मानसिक विकारांसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तींपैकी केवळ 23 टक्के व्यक्तींना राष्ट्रीय स्तरावर आरोग्य विमा संरक्षण होते. शिवाय हॉस्पिटलायझेशन आणि ओपीडी या दोन्हीसाठीचा खर्च सार्वजनिक क्षेत्रातील रुग्णालयांपेक्षा खाजगी क्षेत्रातील रुग्णालयांमध्ये जास्त होता.
डॉ. आलोक रंजन यांनी सांगितलं की, आपल्या समाजात अजूनही मानसिक आजाराशी संबंधित समस्यांबद्दल बोलण्यास लोकं संकोच करतात. मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना वाटतं की, जर प्रत्येकाला आपल्या आजाराची माहिती मिळाली तर समाज त्यांच्याबद्दल काय विचार करेल. त्यामुळे समाजात असे वातावरण निर्माण केलं पाहिजे की, मानसिक आजाराने ग्रस्त असलेले लोक त्यांच्या आजाराविषयी बिंधास्त बोलून त्यावर उपचार घेतील.