मुंबई : PM Kisan Yojana:केंद्र सरकारच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत दरवर्षी 6 हजार रुपये देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्यात येतात. पीएम किसान योजनेंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हप्ते जमा झाले आहेत.
तर 11 वा हप्ताही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे. त्याआधी ज्या लाभार्थ्यांनी आतापर्यंत त्यांचे ई-केवायसी पूर्ण केले नसेल तर त्यांना त्यांचा 11 वा हप्ता मिळणार नाही.
यापूर्वी किसान पोर्टलवरील ई-केवायसी सेवा काही काळासाठी बंद करण्यात आली होती आणि लोकांना त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट देऊन त्यांचे केवायसी पूर्ण करण्यास सांगण्यात आले होते. पण आता अधिकृत वेबसाइटवर ही सुविधा पुन्हा सुरू झाली आहे आणि तुम्ही घरबसल्या तुमचे ई-केवायसी पूर्ण करू शकता. ई-केवायसीची अंतिम तारीख 22 मे 2022 आहे.
यासाठी सर्वप्रथम PM किसान योजनेच्या अधिकृत पोर्टल https://pmkisan.gov.in/ ला भेट द्या. येथे होमपेजवर 'फार्मर्स कॉर्नर' वर क्लिक करा आणि नंतर 'ई-केवायसी' पर्याय निवडा.
त्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज दिसेल. येथे तुम्हाला तुमच्या आधार कार्डची माहिती भरावी लागेल आणि नंतर सर्च टॅबवर क्लिक करावे लागेल.
यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर वन टाइम पासवर्ड (OTP) पाठवला जाईल. OTP एंटर करा आणि 'Submit OTP' वर क्लिक करा. यानंतर तुमचे ई-केवायसी पूर्ण होईल.
पीएम किसान योजनेअंतर्गत, सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी म्हणून वार्षिक 6,000 रुपये मिळतात. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये जमा केली जाते.