नवी दिल्ली : सालाबादप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर्षीची दीपावली राजौरीत सैनिकांसह साजरी करणार आहेत. पंतप्रधान राजौरीत दाखल झाले आहेत. सलग सहाव्या वर्षी पंतप्रधान मोदी सैनिकांसह दिवाळी साजरी करणार आहेत. विशेष म्हणजे अनुच्छेद ३७० काढून टाकल्यावर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच एलओसीलगतचा दौरा आहे.
आधीच्या कार्यकाळात पाचही वर्षे पंतप्रधानांनी जवानांसह दिपावली साजरी केली. २०१४ मध्ये पंतप्रधानांनी २० हजार फूट उंचावर सियाचीनमध्ये सैनिकांसह दीपावली साजरी केली होती. तर २०१५ मध्ये पंतप्रधानांनी अमृतसरमध्ये डोगरा रेजिमेंटच्या स्मारकाला भेट देत शहिदांना वंदन केलं होतं. २०१६ मध्ये पंतप्रधानांनी हिमाचलच्या किन्नोर जिल्ह्यात इंडो तिबेटन बॉर्डर पोलिसांसह दिवाळी साजरी केली.
२०१७ मध्ये पंतप्रदानांनी जम्मू काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये दिवाळी साजरी केली तर २०१८ मध्ये उत्तराखंडच्या भारत चीन सीमेवर हर्षिलमध्ये आयटीबीपीच्या जवानांसह पंतप्रधानांनी दीपावली साजरी केली.