नवी दिल्ली : देशातील प्रत्येकजण चौकीदार आहे. पण काही बौद्धिक दिवाळखोरांना चौकीदार ही संकल्पनाच समजलेली नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. मैं भी चौकीदार या मोहिमेअंतर्गत आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ५०० देशातील जनतेशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. कुणालाही देशाच्या संपत्तीवर हात मारू देणार नाही, असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला.
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात उद्रेक झाला होता. यानंतर भारतीय जवानांनी बालाकोटमध्ये एयर स्ट्राईक केला. जिथून दहशतवाद्यांचा रिमोट कंट्रोल चालतो तिकडेच हल्ला करण्याचं ठरवलं आणि भारतीय हवाई दलाने हा एयर स्ट्राईक केला. या हल्ल्याचं सगळं श्रेय भारतीय हवाई दलाचं आहे, असं मोदी म्हणाले.
'भारतीय जवानांवर माझा पूर्ण विश्वास आहे. जवान देशाची मान कधीच खाली पडू देणार नाहीत. मुंबईमध्ये येऊन दहशतवाद्यांनी अनेकांचे प्राण घेतले. उरीमध्ये येऊनही त्यांनी हल्ला केला. हे कधीपर्यंत चालणार? म्हणून मी लष्कराला स्वातंत्र्य दिलं. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधल्या दहशतवादी तळांवर हल्ले केले, पण भारतातल्या काही जणांनी मोदींनाच शिव्या दिल्या, हे दुर्दैवी आहे,' अशी टीका मोदींनी केली.
'आत्तापर्यंत अनेक पंतप्रधान झाले, पण जर मोदीने आपला राजकीय फायदा बघितला असता, तर तो मोदी नसता. जर राजकारण लक्षात ठेवून देश चालवला असता, स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी निर्णय घेतले असते, तर देशाला मोदींची गरज नव्हती', असं वक्तव्य मोदींनी केलं.
देशातल्या ५०० ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, योगी आदित्यनाथ असे विविध नेते विविध ठिकाणी उपस्थित होते. तर मुंबईत वांद्र्याच्या उत्तर भारतीय संघ सभागृहात आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आदींनी हजेरी लावली.