अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमती नदीच्या पात्रातून सी प्लेनच्या माध्यमातून अंबाजीच्या दर्शनाला गेलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादमधून साबरमती रिव्हर फ्रंटवरू सी प्लेनच्या माध्यमातून १५० किलोमीटरचे अंतर कापून मेहसाणातल्या धरोई धरणावर गेलेत.
मोदी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अंबाजीच्या चरणी पोहोचलेत. त्यानंतर भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यासह ओबीसी आणि आमदार आणि खासदारांशी ऑडिओ क्लीपच्या माध्यमातून संवाद साधला आणि निवडणूक प्रचाराचा शेवट केला. उत्तर गुजरातमध्ये मोठ्या संख्येनं ओबीसी समाज आहे. त्यामुळेच मोदींनी अखेरच्या दिवशी ओबीसी मतदारांसाठी रणनिती आखल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, मंदिरात जाणं गैर आहे का, असे थेट सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केलाय. गुजरात निवडणूक प्रचारादरम्यान वेगवेगळ्या मंदिरांना भेटी दिल्याबद्दल भाजपनं उडवलेल्या खिल्लीला आज काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रत्युत्तर दिले. देवळात जाणं गैर आहे का?, असा सवाल करत, मी मंदिरात जाऊन गुजरातच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतोय, असा टोला राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विकासाबाबत खोटे बोलत आहेत. विकासाचे चित्र रंगवले जातेय, अशी टीका करत गुजरातमध्ये आरोग्य, शिक्षण सेवा महाग आहेत, यावर काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बोट ठेवले. राहुल गांधी यांनी अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.