नवी दिल्ली : शेतकऱ्यांना लवकरच एक आनंदाची बातमी मिळणार आहे. येत्या काही दिवसात पीएम किसान योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana) मिळणाऱ्या रक्कमेत वाढ केली जाऊ शकते. केंद्र सरकार या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम दुप्पट करु शकते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार शेतकऱ्यांना 6 हजारांऐवजी 12 हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांना जिथे 2 हजार रुपये मिळायचे तिथे 4 हजार रुपये मिळतील. (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana now instead of 6 thousand to 12 thousand rupees know details)
4 हजारांचा हप्ता मिळणार?
मीडिया रिपोर्टनुसार, बिहारचे कृषी मंत्री अमरेंद्र प्रताप सिंह यांनी याबाबत दिल्लीत केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची भेट घेतली होती. अमरेंद्र प्रताप सिंह यांच्यानुसार, केंद्र सरकार या योजनेतून देण्यात येणारी रक्कम दुप्पट करणार आहे. त्या संबंधित सर्व तयारी सरकारने केली आहे. मात्र हा फक्त कृषी मंत्र्यांकडून दावा करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार 500 कोटी ट्रान्सफर
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या सोमवारी देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार 500 कोटी रुपये ट्रान्सफर केले होते. शेतकऱ्यांच्या जीवन सुसह्य करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, असं मोदी ही रक्कम खात्यात ट्रान्सफर करण्याच्या एकदिवस आधी म्हणाले होते. त्या बदलाची सुरुवात मोदींनी या योजनेद्वारे केली. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले. मोदींच्या विधानावरुन या योजनेचा हफ्ता वाढवला जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
शेतकऱ्यांना मिळाल नववा हफ्ता
आतापर्यंत या योजनेनुसार केंद्र सरकारकडून नववा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. पहिला हफ्त्यात एकूण 3,16,06,630 शेतकऱ्यांना प्रत्येकी 2 हजार पाठवण्यात आले आहेत. तर 9 व्या हफ्त्यात आतापर्यंत 9,90,95,145 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला आहे. तर आता येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात नववा हफ्ता पाठवण्यात येणार आहे. या योजनेची सुरुवात ही 2018 मध्ये करण्यात आली होती. शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट व्हावं, असं या योजनेमागील उद्देश आहे.
जबरदस्त स्कीम
या योजनेनुसार लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. ही रक्कम एकूण 3 हफ्त्यात पाठवली जाते. या योजनेनुसार आतापर्यंत 1.38 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली आहे.