अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : इस्त्रोच्या महत्वकांक्षी चांद्रयान -२ मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. चांद्रयान -२ हे संपूर्णपणे स्वदेशी बनावटीचे यान आहे. तसंच यावरील सर्व उपकरणे ही स्वदेशी बनावटीची आहेत. या उपकरणांच्या सहाय्यानं चंद्राचा विविध कोनातून अभ्यास केला जाणार आहे. चंद्राबद्दलची अधिकाधिक माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. चांद्रयान - २ हे तब्बल ३ हजार ८७७ किलोग्रँम वजनाचे आहे. एवढे मोठं यान पाठवण्यासाठी जीएसएलव्ही मार्क ३ या भरभक्कम प्रक्षेपकाचा वापर केला जाणार आहे. संपूर्ण चांद्रयान -२ चे तीन मुख्य भाग आहेत आणि प्रत्येक भागावार विविध उपकऱणे आहेत. जी चंद्राचा अभ्यास करणार आहेत.
चांद्रयान -२ च्या मुख्य भागाचे नाव आहे ऑर्बिटर. या ऑर्बिटरचे वजन तब्बल २ हजार ३७९ किलोग्रॅम एवढं आहे. हे ऑर्बिटर हे चंद्राच्या भोवती १०० बाय १०० किलोमीटर अशा वर्तुळाकार कक्षेत भ्रमण करत रहाणार आहे. याचा कार्यकाल एक वर्ष एवढा नियोजित ठेवण्यात आला आहे. ऑर्बिटरवर एकूण ८ प्रमुख वैज्ञानिक उपकरणे आहेत. चंद्राबद्दल माहिती गोळा करण्याचे मुख्य काम ही उपकरणे करणार आहेत.
टेरेन मॅपिंग कॅमेरा हे एख प्रमुख उपकरण असणार आहे. चंद्राच्या जमिनीचा त्रिमितीय नकाशा तयार करण्याचं काम हे उपकरण करणार आहे. सोलर एक्सरे मॉनिटॉर हे आणखी एक उपकरण चांद्रयान -२ च्या ऑर्बिटरवर असणार आहे. चंद्रावर वातावरण नसल्यानं थेट सुर्यप्रकाश तिथे पोहचत असतो. तेव्हा चांद्रभूमीवर सौर उर्जेच्या चढ-उताराची तीव्रता मोजण्याचे काम सोलर एक्सरे मॉनिटॉर उपकरण करणार आहे.
लार्ज एरिया सॉफ्ट एक्स रे स्पेक्ट्रोमिटर हे आणखी एक महत्वाचे वैज्ञानिक उपकरण आहे. चांद्रभुमिमध्ये नेमकी कोणती खनिजे आहेत याची माहिती या उपकरणाद्वारे गोळा केली जाणार आहे. चंद्रावरील मॅग्नेशियम, अँल्युमिनिम, सिलिकॉन, कँल्शियम, लोह, सोडियम अशा खनिजांचे नेमके प्रमाण यानिमित्तानं समजणार आहे. ऑर्बिंटर हाय रिझोल्युशन कॅमेरा हा आणखी एक कॅमेरा ऑर्बिटरवर असणार आहे. चंद्राची अत्यंत जवळची सुस्पष्ट छायाचित्रे घेण्याचे काम हे उपकरण करणार आहे.
विशेषतः चंद्रावर उतरण्याची नक्की जागा या कॅमेऱ्याने घेतलेल्या छायाचित्रावरुन नक्की केली जाणार आहे. इमेजिंग आयआर स्पेक्ट्रोमिटर हा आणखी एक कॅमेरा असणार आहे. विविध तरंग लांबीच्या सहाय्याने चंद्राचा नकाशा तयार करण्याचं काम केलं जाणार आहे. ड्युएल फ्रिक्वेन्सी सिंथेटीक अपार्चर रडार. या उपकरणाद्वारे चंद्राच्या ध्रुवांचा अभ्यास केला जाणार आहे.
विशेषत चंद्र भूमिची जाडी आणि त्याखाली असलेले बर्फाचे अस्तित्व याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. CHACE 2 (चेस २) या उपकरणाद्वारे चंद्राच्य बाहेरील वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे. ड्युएल फ्रिक्वेन्सी रेडियो सायन्स या उपकरणाद्वारे चंद्राच्या जमिनीच्या वर काही किलोमीटर उंचावरील वातावरणाचा अभ्यास केला जाणार आहे.
चंद्रभूमीवर लँडर नावाचे उपकरण उतरणार आहे. ज्याचे नाव विक्रम असं ठेवण्यात आलं आहे. इस्त्रोचे संस्थापक विक्रम साराभाई यांच्या नावावरुन चंद्रावर उतरणाऱ्या उपकरणाचे नाव विक्रम ठेवण्यात आलं आहे. या लँडरचे वजन एक हजार ४७१ किलोग्रॅम एवढे असून त्याचा कार्यकाल सुमारे १४ दिवस एवढा निश्चित कऱण्यात आला आहे. या लँडरवर एकूण ३ मुख्य उपकरणे आहेत.
रेडियो अनॉटॉमि ऑफ मून बाऊंड हायपरसेंसेटीव आयनोस्फिर आणि अटमोस्फिअर ( RAMBHA ) या नावाचे एक महत्वाचे उपकरण यावर आहे. या उपकरणाद्वारे पदार्थाची एक अवस्था असलेल्या प्लाझ्माच्या अस्तित्वाचा शोध चंद्रभूमीवर घेतला जाणार आहे. तसंच इलेक्ट्रॉन कणांचे अस्तिव शोधण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. तर चंद्रा सरफेस थर्मो फिजिकल एक्सप्रिमेंट ( ChaSTE ) नावाच्या उपकरणाद्वारे चंद्राच्या जमिनीवर तापमानातील चढ उतार नोंदले जाणार आहेत. तर ल्युनर सेसमिक अक्टीव्हीटी या उपकऱणाद्वारे चंद्रभूमीवर भूकंप कसे आणि किती होतात, जमिनीच्या हालचाली कशा आहेत याची नोंद केली जाणार आहे.
चंद्रभूमीवर २७ किलो वजनाचा 'प्रज्ञान' नावाचा रोव्हर प्रत्यक्ष संचार करणार आहे. लँडरच्या पोटातून बाहेर पडत सुमारे ५०० मीटर अंतर कापत १४ दिवस कार्यरत रहाण्याचे रोव्हरचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रज्ञान रोव्हरवर एकूण २ उपकरणे आहेत.
अल्फा पार्टिकल क्स रे स्पेक्ट्रोमिटर या उपकरणाद्वारे चंद्रावर उतरलेल्या भागांत कोणती खनिजे आहेत. याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर लेझर इन्डुस ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप या उपकरणारद्वारे विशिष्ट लेझरद्वारे चंद्रभूमीवरील पदार्थाच्या प्लाझ्माच्या अस्तित्वाचा अभ्यास केला जाणार आहे.
याआधीच चंद्राबद्दल ढिगभर माहिती गोळा झाली असतांनाही इस्त्रोच्या चांद्रयान - १ च्या मोहिमेत चंद्रावरील पाण्याचा शोध लागला होता. विविध उपकरणांद्वारे चंद्राभोवती फिरतांना, प्रत्यक्ष चंद्रभूमीवरुन चांद्रयान -२ ची मोहिम कोणता नवा शोध लावते, चंद्राबद्दलची नवी कोणती माहिती गोळा करते हे बघणे महत्वाचं ठरणार आहे.