नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याचा प्राथमिक अहवाल केंद्रीय राखीव पोलीस दलाने सादर केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाला दिलेल्या या अहवालामध्ये हल्ल्यात पाकिस्तानचा थेट सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाकिस्तानी लष्कराच्या मदतीशिवाय एवढा मोठा हल्ला करणे शक्य नसल्याचे सीआरपीएफने आपल्या अहवालात म्हटले आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दलाने या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'हा हल्ला आम्ही कधीच विसरणार नाही आणि हल्लेखोरांना सोडणारही नाही,' असा निर्धार सीआरपीएफने केला आहे. सीआरपीएफच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पुलवामा इथे शहीद झालेल्या जवानांना आज श्रद्धांजली वाहण्यात आली. ट्विटसोबत सीआरपीएफने श्रद्धांजलीपर एक छायाचित्र पोस्ट केले आहे. 'पुलवामामध्ये हौतात्म्य आलेल्या आमच्या बहाद्दूर जवानांना आम्ही सॅल्यूट करतो. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. ही घटना आम्ही कधीही विसरणार नाही आणि यासाठी जबाबदार असलेल्यांना माफ करणार नाही. या हल्ल्याचा बदला घेतला जाईल, असे सीआरपीएफने म्हटले आहे.