जम्मू: पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण दुवे आता तपासयंत्रणांच्या हाती यायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला या हल्ल्यात आरडीएक्सचा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र, प्राथमिक तपासानंतर या हल्ल्यासाठी आरडीएक्सचा वापर झाला नसून खते बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांचा वापर झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आज सकाळी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि एनएसजीच्या पथकातील फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळी स्फोटाच्या तपासासाठी दाखल झाले. यावेळी त्यांच्या हाती लागलेल्या पुराव्यांवरून या हल्ल्यासाठी वापरण्यात येणारी स्फोटके खतांसाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांच्या सहाय्याने बनण्यात आल्याची शक्यता समोर आली. तसेच स्फोटाची तीव्रता वाढवण्यासाठी या स्फोटकांमध्ये धातुचे तुकडे, खिळे आणि शिसाचे गोळे वापरण्यात आले होते.
या हल्ल्यातील आत्मघातकी दहशतवादी अदिल अमहद दार याच्या मृतदेहाचे परीक्षणही न्यायवैद्यक तज्ज्ञांकडून करण्यात आले. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, दहशतवाद्यांनी स्फोटकांसाठी लागणारे हे सर्व साहित्य पंजाब आणि हरियाणाच्या बाजारपेठेतून खरेदी केले असावे. स्फोटकांमधील बहुतांश साहित्य हे बाजारपेठेत सहजपणे उपलब्ध असते. त्यामुळेच तपासयंत्रणांना या कटाचा सुगावा लागला नसावा.
तर दुसरीकडे सीआरपीएफनेही या हल्ल्यासंदर्भातील प्राथमिक अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला आहे. यामध्ये स्थानिकांच्या मदतीने हा हल्ला झाल्याचे म्हटले आहे. तसेच स्फोटकांमधील काही साहित्य पाकिस्तानमधून आल्याची शक्यताही सीआरपीएफच्या अहवालात वर्तविण्यात आली आहे.