Amritpal Singh: 'वारिस पंजाब दे' (Waris Punjab De) संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग (Amritpal Singh) फरार असून पंजाब पोलीस (Punjab Police) त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, 18 मार्चला फरार होण्याआधी अमृतपाल सिंगने जालंधर येथील एका गुरुद्वारात घुसखोरी केली होती. यावेळी त्याने बंदुकीचा धाक दाखवत तेथील लोकांकडून अन्न आणि कपडे मागितले. पोलिसांना गुंगारा देऊन अमृतपाल सिंग पळून गेल्यानंतर पंजाब पोलीस त्याचा शोध घेत असून फरार घोषित करण्यात आलं आहे.
खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग जालंधर येथील एका गुरुद्वारात आपल्या सहकाऱ्यांसोबत पोहोचला होता. यावेळी तब्बल एक तास तो तिथेच थांबला होता. यावेळी त्याने आपला पंजाबी पोषाख काढला आणि शर्ट, पँट घातली. तसंच गुरुद्वारामधील ग्रंथीच्या मुलाची गुलाबी पगडी घातली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमृतपाल सिंगने जालंधरमधील शीख धर्मगुरुच्या फोनवरुन हरियाणाच्या रेवारीमधील एका व्यक्तीशी संपर्क साधला. यावेळी त्याने इतर काही समर्थकांनाही फोन केला आणि दोन दुचाकी घेऊन येण्यास सांगितलं.
धर्मगुरुच्या मुलाचं लग्न होणार असून, मुलीकडचे पाहुणे गुरुद्वारात येणार होते. त्याचवेळी अमृतपाल सिंग गुरुद्वारात पोहोचले होते. धर्मगुरुंचा हेच पाहुणे असल्याचा गैरसमज झाला आणि त्यांनी त्यांना आत प्रवेश करण्यास मुभा दिली. अमृतपालने यावेळी कुटुबीयांनाही बंदुकीचा धाक दाखवत धमकावलं अशी माहिती आहे. दरम्यान, बाईकवरुन पळून जाण्याआधी अमृतपालने फोन करण्यासाठी वापरलेला मोबाइल नष्ट केला.
पोलीस अमृतपाल सिंगने दुचाकीवरुन पळून जाण्याआधी नेमके कोणाला फोन केले याची माहिती मोबाइलच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
गुरुद्वारामधील धर्मगुरुने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अमृतपाल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी गुरुद्वारापासून 100 मीटर अंतरावर आपली ब्रेझा कार पार्क केली होती. याच ठिकाणहून पोलिसांनी रायफल आणि तलवारी जप्त केल्या आहेत.
यादरम्यान पोलिसांनी अमृतपाल आणि त्याच्या चार सहकाऱ्यांविरोधात शाहकोट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. तसंच अमृतपालविरोधात लूकआऊट सर्क्यूलर काढण्यात आलं आहे. तसंच त्याच्याविरोधात NSA लावण्यात आलं आहे. याशिवाय अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत अमृतपाल सिंगच्या 154 समर्थकांना अटक केली आहे.