लखनऊ : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशातल्या अमेठीमधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याआधी अमेठीत राहुल गांधींनी रोड शोच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा आणि रॉबर्ट वाड्रा देखील उपस्थित होते. गेल्या १५ वर्षांपासून अमेठीचे राहुल गांधी खासदार आहेत. अमेठीत राहुल गांधींविरोधात भाजपकडून स्मृती इराणी रिंगणात आहेत. अमेठीत ६ मे रोजी मतदान होणार आहे. राहुल गांधी अमेठीसोबतच केरळच्या वायनाडमधूनही निवडणूक लढवत आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला आणि गांधी घराण्याचा पारंपारिक मतदारसंघ पुन्हा एकदा जिंकण्याची तयारी झाली आहे. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन राहुल गांधींनी केले. १९६७ मध्ये अमेठी मतदारसंघ तयार झाला, तेव्हापासून दोन वेळचा अपवाद सोडला तर हा मतदारसंघ काँग्रेसकडेच आहे. आतापर्यंत १३ निवडणुकांमध्ये ९ वेळा गांधी घराण्यातलाच खासदार झाला आहे.
१९८० साली या मतदारसंघातून संजय गांधी निवडून आले. त्यानंतर १९८१ पासून १९९१ पर्यंत राजीव गांधी अमेठीचे खासदार होते. १९९९ ला सोनिया गांधी राजकारणात सक्रिय झाल्या आणि १९९९ ते २००४ पर्यंत सोनियांनी अमेठीचं प्रतिनिधित्व केलं. २००४ ते आतापर्यंत राहुल गांधी अमेठीचे खासदार आहेत.
Congress President Rahul Gandhi files his nomination from Amethi for #LokSabhaElections2019 . Sonia Gandhi, Priyanka Gandhi Vadra and Robert Vadra also present. pic.twitter.com/EvNswqEm3N
— ANI UP (@ANINewsUP) April 10, 2019
अमेठीतून अर्ज दाखल करताच राहुल गांधींनी पुन्हा चौकीदार मोदींवर निशाणा साधला. २०१४ ला भाजपाच्या स्मृती इराणींनी राहुल गांधींना अमेठीतून तगडी टक्कर दिली होती. मताधिक्य लाखापर्यंत खाली आलं होतं. गेली ५ वर्षं स्मृती इराणींनी अमेठीवर विशेष लक्ष दिले आहे. त्यामुळे यंदाची लढाई राहुल गांधींसाठी सोपी नसल्याचं बोलले जात आहे.
राहुल गांधी वायनाडबरोबरच अमेठीतूनही लढत आहेत. ते दोन्ही ठिकाणांहून विजयी झाले तर ते अमेठीचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. तसं झालंच तर अमेठीचा वारसा प्रियंका गांधी-वाड्रांकडे येईल आणि प्रियंका अमेठीमधून पोटनिवडणूक लढवतील, अशी शक्यता आहे.
अमेठीत अर्ज भरताना मामाबरोबर त्याची भाचे कंपनी आवर्जुन उपस्थित होती. नेहरु जॅकेट घातलेला रेहान आणि गांधी घराण्याला शोभेल अशा पांढऱ्या शुभ्र पंजाबी ड्रेसमधली मिराया. दोघेही राहुल मामाबरोबर रॅलीत दिसले. सध्या दोघेही शिकतायत. पण गांधी घराण्याचे वारसदार म्हणून भविष्यात यांच्याकडेच जनता पाहणार आहे.