नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीमध्ये होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रम आणि परेड कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना आमंत्रण देण्यात आलेलं आहे. पण असं असलं तरी राहुल गांधींना या कार्यक्रमात पहिल्या रांगेमध्ये बसता येणार नाही. २६ जानेवारीच्या या कार्यक्रमात राहुल गांधींना चौथ्या रांगेत बसावं लागणार आहे.
१९५० पासूनची ही पहिलीच वेळ आहे जेव्हा काँग्रेस अध्यक्षाला पहिल्या रांगेमध्ये बसायला स्थान मिळणार नाही. हा निर्णय केंद्र सरकारची मानसिकता दाखवत आहे, अशी टीका काँग्रेसनं केली आहे. याआधी विरोधी पक्षात असतानाही काँग्रेस अध्यक्षांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्ताच्या कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसवलं जायचं. २०१४ साली भाजपची सत्ता आल्यानंतरच्या प्रत्येक प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात अमित शहांना पहिल्या रांगेत बसवण्यात आलं आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात चौथ्या रांगेत बसवण्यात आलेलं असलं तरी राहुल गांधी या कार्यक्रमाला जाणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात १० देशांचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन करतील.