मुंबई : नवी दिल्ली ते वाराणसी दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर आता मुंबई ते पुणे आणि नाशिक, वडोदरा शहरातही सेमी हाय स्पीडची ट्रेन धावण्याची शक्यता आहे. वंदे भारत एक्सप्रेसने दिल्ली आणि वाराणसीतील प्रवासाचा वेळ 40 टक्क्यांनी वाचला आहे. अशा ट्रेन मुंबई ते पुणे, मुंबई ते नाशिक, मुंबई ते वडोदरा दरम्यान चालवली जाऊ शकेल का ? यावर आम्ही विचार करत असल्याचे रेल्वे बोर्डाचे सदस्य राजेश अग्रवाल यांनी सांगितले.
वंदे भारतच्या पॅटर्नवर ट्रेन चालवण्याचे प्रात्याक्षिक पुढच्या आठवड्यात करणार असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. यामध्ये एक एसी ईएमयू रेक आणि एक विना एसी मेमू रेक मध्य पश्चिम रेल्वेला दिले जातील. जर परिक्षण योजनेनुसार झाले तर आम्ही मुंबई ते पुणे आणि नाशिक दरम्यान प्रवासाची वेळ दोन तासांनी कमी करु शकू असेही ते म्हणाले. यावर अंतिम निर्णय अजून घेण्यात आला नाही. सध्या तरी आम्ही संभाव्यता शोधत असल्याचे ते म्हणाले.
आता भारतीय रेल्वेने वंदे भारत ही एक्सप्रेस मुंबईत आणण्याच्या तयारीत आहे. सध्या मुंबई ते दिल्ली चालणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला 16 तासांचा अवधी लागतो. या ट्रेनमुळे मुंबई ते दिल्ली मार्गावरील प्रवासाचा वेळ 4 ते 5 तासांनी वाचणार आहे.वंदे भारत एक्सप्रेस ही 160 किलोमीटर प्रति तास चालते. त्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस हे अंतर 12 तासांत पूर्ण करणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर देशभरात वंदे भारत एक्सप्रेसची चर्चा झाली होती. दगडफेक्यांची समस्या ऐरणीवर आली. दगडफेकीपासून वाचण्यासाठी ट्रेनवर विशेष एंट्री स्पालिंग फिल्मची कोटींग लावण्यात आली. यासोबतच जनावरे रेल्वे ट्रॅकवर येण्याच्या घटना देखील वाढल्या होत्या. यावरही पर्याय शोधण्यात आला आहे. ट्रेनखाली येऊन जनावरे मरण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता ट्रेनच्या पुढच्या भागाचे डिझाईन बदलण्यात आले आहे. नव्या ट्रेनमध्ये फायबर ऐवजी एल्यूमिनियमचे कॅटल गार्ड तयार करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 फेब्रुवारीला वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दिला होता.
- वंदे भारत ही देशातील सर्वात पहिली इंजिनशिवाय चालणारी सर्वात गतिशील रेल्वे
- ही रेल्वे 'मेक इन इंडिया' योजनेंतर्गत चेन्नईच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार
- रेल्वेचे काही सुटे भाग मात्र परदेशातून आयात
- या रेल्वेत स्पेनहून मागवण्यात आलेले विशेष सीट लावण्यात आल्यात. या सीट ३६० डिग्री अंशात फिरेल
- ही रेल्वे तयार करण्यासाठी १०० करोड रुपयांचा खर्च
- या रेल्वेला ऑटोमॅटिक दरवाजे उपलब्ध
- संपूर्ण रेल्वेत एसी उपलब्ध
- या रेल्वेत १६ कोच असून एकावेळी या रेल्वेतून ११०० हून अधिक प्रवासी
- पहिल्या कोचमध्ये ड्रायव्हिंग सिस्टम लावण्यात आलंय तिथेच ४४ सीट
- तर रेल्वेतील दोन एक्झिक्युटिव्ह कोचमध्ये ५२ सीट
- याशिवाय इतर कोचमध्ये ७८ प्रवाशांची बसण्याची व्यवस्था