चंदीगड : बलात्कार प्रकरणी शुक्रवारी न्यायलयाने डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला दोषी ठरवलं. मात्र, याच राम रहीमला यापूर्वी हरियाणातील सरकारने खूप मदत केल्याचं समोर आलं आहे.
यापूर्वी हरियाणातील मनोहर लाला खट्टर सरकारने राम रहीमला खूप मदत केली आहे. तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी राम रहीमच्या 'जट्टू इंजिनिअर' सिनेमाला ६ महिन्यांसाठी करमुक्त करण्याची घोषणा केली होती.
खट्टर सरकारने मे महिन्यात करनाल येथे आयोजित कार्यक्रमात सिनेमा करमुक्त करण्याची घोषणा केली होती. २०१४ साली विधानसभा निवडणुकांपूर्वी डेरा प्रमुखने भाजपला समर्थन दिलं होतं.
राम रहीमसोबत मुख्यमंत्र्यांचा सहभाग
मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी डेरा प्रमुख राम रहीमसोबत सफाई मोहीम सुरु केली होती. राज्याचे आरोग्य आणि खेळमंत्री अनिल विज यांनीही ग्रामीण खेळांच्या प्रचारासाठी विवेकाधीन फंडच्या माध्यमातून डेराला ५० लाख रुपये दिले होते.
विज यांनी केलं होतं डेराचं कौतुक
सिरसामध्ये डेराद्वारा आयोजित एका कार्यक्रमात विज यांनी म्हटलं होतं की, डेरा सच्चा सौदा खुप दिवसांपासून खेळांचं प्रसार करत आहे आणि आता भाजप सरकार ऑलिंम्पिक खेळांच्या तयारीसाठी सर्व खेळांच्या संबंधित प्रचार करेल.
५० लाख देण्याची घोषणा
विज यांनी म्हटलं होतं की, "राम रहीम खेळाला प्रोत्साहन देतात. त्यामुळे मी माझ्या फंडातून ५० लाख रुपयांची देणगी देत आहे."
हरियाणातील आणखीन एक मंत्री मनिष ग्रोवर यांनीही डेरा खेल गावाला ११ लाख रुपये देण्याची घोषणा केली होती.