RIP Sir Trends On Social Media Vijayakanth Death: देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम म्हणजेच डीएमडीके पक्षाचे संस्थापक तसेच प्रसिद्ध तमिळ अभिनेते विजयकांतन यांचं निधन झालं आहे. चेन्नईमध्ये प्रदीर्घ आजारापणानंतर आज विजयकांतन यांची प्राणज्योत मालावली. ते 71 वर्षांचे होते.
डीएमडीके पक्षाने त्यांच्या एक्स (पूर्वीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन विजयकांतन यांच्या निधनाची माहिती दिली आहे. विजयकांतन यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यांचा मृतदेह आधी घरी नेण्यात आला. त्यानंतर तो पक्ष कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. नोव्हेंबर महिन्यामध्ये विजयकांतन यांना एमआयओटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. विजयकांतन यांची प्रकृती दिवसोंदिवस खालावत चालली होती. त्यांना खोकल्याचा आणि घशात खवखव होण्याचा प्रचंड त्रास होत होता. मागील 14 दिवसांपासून ते डॉक्टरांच्या विशेष टीमच्या देखरेखीखाली होते.
विजयकांतन हे 'कॅप्टन' नावाने ओळखले जायचे. त्यांनी तामिळ चित्रपटांमधून प्रचंड लोकप्रियता मिळवले. सक्रीय राजकारणामध्ये प्रवेश करण्याआधी त्यांनी 154 तामिळ चित्रपटांमधून भूमिका साकारल्या. दक्षिण भारतीय कलाकारांच्या असोसिएशनमध्ये म्हणजेच नंदीघर संगममध्ये पदाधिकारी असताना विजयकांतन यांनी चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या कामगारांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले होते. त्यामुळे ते चाहत्यांबरोबरच चित्रपटसृष्टीतील कामगारांमध्येही प्रचंड लोकप्रिय होते. त्यांनी देसिया मुरपोक्कू द्रविड कळघमचे म्हणजेच डीएडीके पक्षाची 2005 साली स्थापना केली.
2006 मध्ये त्यांच्या डीएमडीके पक्षाने विधानसभेच्या सर्व जागांवर निवडणूक लढवली. आश्चर्यकारकरित्या त्यांच्या पक्षाला 10 टक्क्यांपर्यंत मत मिळाली. मात्र विजयकांतन हे स्वत: वगळता कोणत्याही उमेदवाराला यश मिळालं नाही. 2011 साली डीएमडीकेने एआयएडीएमकेशी युती करुन निवडणूक लढवली. यावेळेस त्यांनी 41 जागा लढवल्या. त्यापैकी 26 जागा त्यांनी जिंकल्या. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांनी डीएमकेपेक्षाही अधिक जागा मिळवल्याने विजयकांतन थेट विरोधी पक्ष नेते झाले. त्यांचा पक्ष हा विरोधी बाकावरील सर्वात मोठा पक्ष होता. त्यांनी संपूर्ण पाच वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजेच 2011 ते 2016 दरम्यान विरोधीपक्ष नेते पद भूषवलं.
पंतप्रधान मोदींनीही विजयकांत यांच्याबरोबरच जुना फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. "विजयकांत यांच्या निधनाने फार दु:खी झालो आहे. तमिळ चित्रपट जगतातील एक आख्यायिका म्हणून त्यांना ओळखलं जायचं. त्याच्या मोहक अभिनय कौशल्याने लाखो लोकांची मने त्यांनी जिंकली. एक राजकीय नेता म्हणून ते सार्वजनिक जीवनामध्ये लोकांच्या सेवेसाठी अत्यंत वचनबद्ध होते. तामिळनाडूच्या राजकीय क्षेत्रावर त्यांच्या कामाचा प्रभाव कायमच राहिला आहे. त्यांच्या निधनाने भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. माझा एक जवळचा मित्र या नात्याने मी त्याच्याशी अनेक वर्षात केलेले संभाषण आज मला आठवले. या दुःखाच्या वेळी माझे विचार त्यांच्या कुटुंबीयांसह, चाहते आणि असंख्य समर्थकांसोबत आहेत. ओम शांती," असं पंतप्रधान मोदींनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.
திரு. விஜயகாந்த் அவர்களின் மறைவு மிகுந்த வருத்தத்தை அளிக்கிறது. தமிழ்த் திரைப்பட உலகின் ஜாம்பவானான இவரது வசீகர நடிப்புத்திறன் கோடிக்கணக்கானவர்களின் இதயங்களைக் கவர்ந்தது. ஒரு அரசியல் தலைவராக, அவர் பொதுமக்கள் சேவையில் தீவிர அர்ப்பணிப்புடன் செயல்பட்டார், தமிழக அரசியல் களத்தில்… pic.twitter.com/XXct01yYsW
— Narendra Modi (@narendramodi) December 28, 2023
मतभेद झाल्याने विजयकांतन यांनी एआयएडीएमकेबरोबरची युती तोडली. त्यामुळे डीएमडीकेच्या अनेक आमदारांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळेच विरोधी पक्ष म्हणून पक्षाची ताकद कमी झाली. विजयकांतन हे तामिळनाडू विधासनसभेमध्ये 2 वेळा निवडून गेले होते. पहिल्यांदा विरुद्धचलम आणि दुसऱ्यांदा ऋषीवंदीयम मतदारसंघातून ते जिंकून आले होते. 2014 मध्ये डीएमडीकेने पंतप्रधान नरेंद्र मदोींच्या नेतृत्वाखालील एनडीएचा घटक पक्ष म्हणून निवडून लढवली होती. मात्र त्यांचा दारुण पराभव झाला. त्यांच्या मतांची टक्केवारीही पडली. विजयकांतन यांच्या मृत्यूनंतर त्यांचा पंतप्रधान मोदींबरोबरच एक जुना फोटोही व्हायरल होत आहे. पहिल्यांना निवडून आल्यानंतर मोदींनी पहिल्याच संसदीय बैठकीनंतर अगदी गळाभेट घेऊन विजयकांतन यांनी निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले होते.
विजयकांतन यांच्या निधनामुळे चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. एक उत्तम अभिनेता आणि त्याहून उत्तम असा नेता तामिळनाडूने गमावल्याच्या भावना सोशल मीडियावरुन व्यक्त केल्या जात आहे. सोशल मीडियावर आरआयपी सर (RIP Sir) हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे.