बई : साध्वी प्रज्ञा यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यापासून अनेकांनी त्यांना विरोध दर्शवला आहे. २६/११ च्या हल्ल्यामध्ये शहिद झालेले हेमंत करकरे यांच्याबद्दल साध्वी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. याबाबत काँग्रेस नेते प्रिया दत्त यांनीही साध्वी यांच्यावर जोरदार टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना साध्वी यांनी, संजय दत्त हा देशद्रोही आहे. १९९३ मध्ये घडलेल्या बॉम्बस्फोटात तो सामिल होता. त्यावेळी प्रिया दत्त यांनी कधी त्याचा विरोध केला होता का ? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
साध्वी यांनी हेमंत करकरे यांचा मृत्यू त्यांच्या कर्मामुळेच झाला. मी त्यांना तुमचा सर्वनाश होईल, अशा शाप दिला होता. तो अखेर खरा ठरला, असे वक्तव्य केले होते. यावर निवडणूक आयोगानेही साध्वी यांनी केलेल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण मागितले होते. तसेच कॉग्रेस नेता प्रिया दत्त यांनी साध्वी यांच्या विधानाला विरोध दर्शवल्याचे ट्विट केले होते.
प्रिया दत्त यांच्या ट्विटला प्रत्यूत्तर देताना साध्वी म्हणाल्या की, १९९३ मध्ये जो बॉम्बस्फोट झाला होता. त्यामध्ये त्यांचा भाऊ संजय दत्त सहभागी होता. न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते. त्याचे दाऊदशी जवळचे संबंध होते. याची खात्री करण्यासाठी यूट्यूबवरील व्हिडीओ पाहा. त्यावेळी प्रिया दत्त यांनी त्यांच्या भावाचा कधी विरोध केला होता का? असे साध्वी म्हणाल्या.
साध्वी प्रज्ञा २००८ सालच्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आहेत. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. भाजपने त्यांना भोपाळ मतदारसंघातून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्याविरोधात रिंगणात उतरवले आहे. यामुळे साध्वी प्रज्ञा सिंह यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली होती, या नोटीशीला आता प्रज्ञा सिंह यांनी उत्तर दिले आहे. मी शहीद करकरेंचा अपमान केला नाही, असे त्यांनी निवडणूक आयोगाच्या नोटीशीला उत्तर दिलं आहे.