नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 मध्ये उत्तर प्रदेशच्या अमेठीतील उमेदवारीबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दिलासा मिळाला आहे. अमेठीतील परतावा अधिकाऱ्यांनी काँग्रेस अध्यक्षांची उमेदवारी वैध ठरवली आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या अमेठी आणि केरळच्या वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केला. पण राहुल यांच्या नागरिकत्वावर एका अपक्ष उमेदवाराने प्रश्नचिन्ह उपस्थित करत यासंदर्भात तक्रार दाखल केली. राहुल यांच्याकडे भारत आणि ब्रिटन अशा दोन देशांचे नागरिकत्व असल्याचा दावा करण्यात आला होता. पण हा दावा फेटाळण्या आला आहे. त्यामुळे राहुल यांच्या अमेठीतील उमेदवारीला हिरवा कंदील मिळाला आहे. राहुल यांच्या निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतित्रापत्राला आव्हान देण्यात आले होते.
उत्तर प्रदेशहून अपक्ष उमेदवार म्हणून लढणाऱ्या ध्रुवलाल यांचे वकील रवि प्रकाश यांनी राहुल यांची नागरिकता आणि शैक्षणिक योग्यतेवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी निर्वाचन अधिकाऱ्यांना यासंदर्भात तक्रार केली. राहुल गांधी यांनी ब्रिटीश नागरिकत्व घेतले होते त्यामुळे त्यांचे नामांकन रद्द करावे असे यात म्हटले होते.
या तक्रारीचा हवाला देत भाजपाने राहुल गांधी यांच्याकडे यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले. ब्रिटनमधील एका कंपनीच्या कागदपत्रांच्या आधारे रवि प्रकाश यांनी हा दावा केला होता. दाखल केलेल्या याचिकेवर उत्तर देण्यासाठी राहुल यांचे वकील राहुल कौशिक यांनी वेळ मागितला होता.