'काँग्रेसचा पराभव हे दुर्दैव, राहुल गांधींना राजीनामा देण्याची गरजच काय?'

इतर पक्षांच्या बड्या नेत्यांचाही पराभव झाला.

Updated: May 25, 2019, 11:22 AM IST
'काँग्रेसचा पराभव हे दुर्दैव, राहुल गांधींना राजीनामा देण्याची गरजच काय?' title=

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होणे, हे दुर्दैव होते. त्यासाठी राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची गरज नाही, असे मत वायव्य मुंबईतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार संजय निरुपम यांनी व्यक्त केले. 

लोकसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी दिल्लीत काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ( CWC) बैठक होत आहे. यावेळी राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा सुरु आहे. मात्र, राहुल यांनी राजीनामा देण्यापूर्वीच काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची पाठराखण करायला सुरुवात केली आहे. 

संजय निरुपम यांनीदेखील शनिवारी ट्विट करून राहुल गांधी यांचे समर्थन केले. त्यांनी म्हटले की, राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही खूप शौर्याने लढलो. राहुल गांधी यांनी प्रचारासाठी खूप मेहनत घेतली, यामध्ये कोणतीही शंका नाही. परंतु, दुर्दैवाने आमचा पराभव झाला. त्यासाठी राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याची गरजच काय? ते काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहिलेच पाहिजेत. जेणेकरून आम्ही त्यांच्या नेतृत्त्वाखाली लढून पुनरागमन करू, असे संजय निरूपम यांनी म्हटले आहे. 

तसेच यंदाच्या निवडणुकीत इतर पक्षांच्या बड्या नेत्यांचाही पराभव झाला. मात्र, त्यांना कोणी राजीनामा द्यायला सांगत नाही. केवळ राहुल गांधी यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी जाणीपूर्वक त्यांचा राजीनामा मागण्याचा डाव आखण्यात आला आहे. ही गोष्ट थांबवली पाहिजे आणि पक्षाने त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे निरूपम यांनी सांगितले.