नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा अद्याप कायम असताना केवळ मुंबईतच नव्हे तर राजधानी दिल्लीतही हालचाली सुरू आहेत. बुधवारी काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांची भेट घेतली. नितीन गडकरी यांचं निवासस्थान आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचं निवासस्थान अगदी आजुबाजुलाच आहेत. परंतु, ही काही महाराष्ट्राच्या सत्ताचर्चेबद्दल किंवा राजकीय भेट नव्हती तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मुद्यावर आपण नितीन गडकरींची भेट घेतल्याचं अहमद पटेल यांनी म्हटलंय. दुसरीकडे, पटेल यांच्या जवळपच्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस नेते पटेल यांनी गुजरातमधल्या भरुचमध्ये सुरू असलेल्या योजनांसंबंधी गडकरी यांची भेट घेतली.
दरम्यान, महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष दिवसेंदिवस पेटतच चाललाय. कोणताही पक्ष माघार घेण्याच्या किंवा तडजोडीच्या मनस्थितीत नाही. थोड्याच वेळेपूर्वी काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी 'सामना'च्या कार्यालयात शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. 'राज्यात भाजपचे सरकार येणार नाही. हीच काँग्रेसची इच्छा आहे', असं त्यांनी या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं. महत्त्वाचं म्हणजे, काही दिवसांपूर्वीच हुसेन दलवाई यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून शिवसेनेला पाठिंबा देण्याची विनंती केली होती. त्यामुळे, भाजपा - शिवसेनेचा काडीमोड झाला तर पुढे आणखीन काही वेगळी समीकरणं राज्यात जुळणार का? याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे.
भाजपा १०५
शिवसेना ५६
राष्ट्रवादी ५४
काँग्रेस ४४
बहुजन विकास आघाडी ३
एमआयएम २
समाजवादी पार्टी २
प्रहार जनशक्ती पार्टी २
माकप १
जनसुराज्य शक्ती १
क्रांतिकारी शेतकरी पार्टी १
महाराष्ट्र नवनिर्माण सेना १
राष्ट्रीय समाज पक्ष १
स्वाभिमानी पक्ष १
अपक्ष १३