'सोनिया गांधी मला पंतप्रधान होऊ देणार नाहीत'; फोन कॉलवर व्यक्त केलेली खंत

Sonia Gandhi Will Not Make Me Prime Minister Of India: पक्षाध्यक्ष असलेल्या सोनिया गांधी पंतप्रधान पद स्वीकारतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. सोनिया गांधींना आघाडीमध्ये असलेल्या इतर पक्षांचा पूर्ण पाठिंबाही होता.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 8, 2023, 11:02 AM IST
'सोनिया गांधी मला पंतप्रधान होऊ देणार नाहीत'; फोन कॉलवर व्यक्त केलेली खंत title=
पुस्तकामध्ये यासंदर्भातील खुलासा करण्यात आला आहे (फाइल फोटो)

Sonia Gandhi Will Not Make Me Prime Minister Of India: माजी दिवंगत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी 2004 साली केंद्रामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होत असताना केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे. प्रणब मुखर्जी यांनी कन्या शर्मिष्ठा मुखर्जीशी बोलताना 'सोनिया गांधी मला पंतप्रधान होऊ देणार नाही,' असं म्हटलं होतं. प्रणब मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी त्यांच्या आगामी ‘इन प्रणब, माई फादर: ए डॉटर रिमेम्बर्स’ या पुस्तकामध्ये हा दावा केला आहे. सोनिया गांधींनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीमधून बाजूला होण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रणबदांनी फोनवरुन मुलीशी चर्चा करताना हे विधान केलं होतं.

यापूर्वी कधीही समोर न आलेले अनेक प्रसंग

शर्मिष्ठा यांनी या पुस्तकामध्ये 'एकदा पंतप्रधान पदासंदर्भात मी वडिलांना प्रश्न विचारला होता' अशी आठवण सांगितली आहे. माझ्या प्रश्नावर त्यांनी, "नाही, त्या (सोनिया गांधी) मला पंतप्रधान होऊ देणार नाहीत," असं उत्तर दिलेल्याचा दावा शर्मिष्ठा यांनी पुस्तकात केला आहे. शर्मिष्ठा या स्वत: काँग्रेसच्या प्रवक्त्या राहिल्या आहेत. आपल्या पुस्तकामध्ये शर्मिष्ठा यांनी प्रणब मुखर्जींच्या राजकीय प्रवासातील यापूर्वी कधीही समोर न आलेले अनेक प्रसंग आणि घटनांनावर प्रकाश टाकला आहे.

डायरीमध्ये नोंदी

'रुपा प्रकाशन'ने प्रकाशित केलेल्या या पुस्तकामध्ये प्रणब मुखर्जींचा जीवनप्रवास शर्मिष्ठा यांनी त्यांच्याच डायरीमधील नोंदीच्या आधारे मुलीच्या नजरेतून मांडला आहे. प्रणब मुखर्जी हे भारताचे अर्थमंत्री म्हणून कार्यरत होते. त्यांनी परराष्ट्र, संरक्षण, अर्थ आणि वाणिज्य मंत्रालयाची जबाबदारीही पार पाडली होती. ते भारताचे 13 वे राष्ट्रपती होते. त्यांनी 2012 ते 2017 दरम्यान आपला कार्यकाळ पूर्ण केला. वयाच्या 84 व्या वर्षी 31 ऑगस्ट 2020 रोजी प्रणब मुखर्जी यांनी जगाचा निरोप घेतला.

सोनिया गांधी पंतप्रधान होतील असं वाटत होतं पण...

2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला होता. पक्षाध्यक्ष असलेल्या सोनिया गांधी पंतप्रधान पद स्वीकारतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. सोनिया गांधींना आघाडीमध्ये असलेल्या इतर पक्षांचा पूर्ण पाठिंबाही होता. मात्र सोनिया गांधींनी पंतप्रधान पद स्वीकारलं नाही. सोनिया गांधींच्या या निर्णयामुळे काँग्रेसमधील नेत्यांबरोबरच आघाडीतील घटक पक्षांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता.

नक्की वाचा >> 'मनमोहन यांना भारतरत्न देण्याची प्रणब मुखर्जींची इच्छा होती मात्र सोनिया..'; मोठा खुलासा

'द पीएम इंडिया नेव्हर हॅड'

आपल्या पुस्तकातील 'द पीएम इंडिया नेव्हर हॅड' या मथळ्या खालील लेखामध्ये शर्मिष्ठा यांनी, "पंतप्रधान पदाच्या शर्यतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय सोनिया गांधींनी घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांबरोबर राजकीय वर्तुळामध्ये अनेक शक्यता व्यक्त केल्या जात होत्या. या पदासाठीच्या प्रमुख दावेदारांमध्ये डॉ. मनमोहन सिंग आणि प्रणब मुखर्जी यांच्या नावाची चर्चा होती," असं म्हटलं आहे.

तुम्ही पंतप्रधान होणार का?

"मला बरेच दिवस बाबांना (प्रणव मुखर्जी यांना) भेटण्याची संधी मिळाली नव्हती कारण ते फारच व्यग्र होते. मात्र मी फोनवरुन त्यांच्याशी चर्चा केली होती. मी अगदी उत्साहाने त्यांना तुम्ही पंतप्रधान होणार का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी थोड्याश्या निराश स्वरात, 'नाही, त्या (सोनिया गांधी) मला पंतप्रधान होऊ देणार नाहीत. मनमोहन सिंग पंतप्रदान होतील,' असं म्हटलं होतं," असा उल्लेख पुस्तकात आहे.