IPS Tripti Bhatt Success Story: चांगली सरकारी नोकरी किंवा लाखोंचं पॅकेज मिळालं की व्यक्ती यशस्वी होते असा अनेकांचा समज असतो. कारण हजारो तरुण यातच समाधान मानून आयुष्य काढतात. पण तृप्ती भट्ट या तरुणीची यशाची व्याख्या यापेक्षा मोठी होती. त्यांना आयपीएस अधिकारी व्हायचे होते. यासाठी त्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 16 सरकारी नोकऱ्यांवर पाणी सोडले. त्यांच्या यशाची काहाणी जाणून घेऊया.
तृप्ती या उत्तराखंडच्या अल्मोडामध्ये राहतात. इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर तृप्ती यांच्यासमोर अनेक पर्याय होते. कित्येक सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये त्यांना मोठ्या रक्कमेच्या पॅकेजची ऑफर होती. पण त्यांनी या ऑफर नाकारल्या. इतकंच नव्हे तृप्ती यांनी इस्रोसहित 6 सरकारी परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या. पण आयपीएस होण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं.
तृप्ती यांचा जन्म एका शिक्षक परिवारात झाला. 4 भावा-बहिणीमध्ये त्या सर्वात मोठ्या. त्यांनी आपलं शालेय शिक्षण बेर्शेबाच्या शाळेतून पूर्ण केल. यानंतर केंद्रीय विद्यालयातून बारावी उत्तीर्ण केली. यानंतर तिने इंजिनिअरिंग करण्यासाठी पंतनगर विश्वविद्यालयात प्रवेश घेतला आणि बीटेक पूर्ण केले. इंजिनीअरिंग झाल्यानंतर मिळालेल्या नोकरीच्या ऑफर्स त्यांनी नाकारल्या.
मला मारुती सुझुकीमध्ये कॅम्पस प्लेसमेंट मिळाली होती, जिथे मी जॉईन केले नाही. त्यानंतर टाटा मोटर्ससहीत अनेक आघाडीच्या कंपन्यांमधून जॉब ऑफर येत होती. इस्रो सॅटेलाईट ऑफिसरची नोकरीदेखील चालून आली होती पण आयपीएस बनण्याच्या स्वप्नामुळे मी या नोकऱ्या नाकारल्याचे तृप्ती यांनी एका मुलाखतीत सांगतिले.
इयत्ता नववीला असताना तृप्तीची भेट तत्कालिन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यासोबत झाली होती. तेव्हा कलाम यांनी तिला हस्तलिखित पत्र दिले होते. ज्यामध्ये प्रेरणादायी ओळ लिहिल्या होत्या. यातूनच तृप्ती यांना शिक्षणाची प्रेरणा मिळाली. शालेय वयापासूनच त्या आयपीएस बनण्याचे स्वप्न पाहू लागल्या.
इंजिनीअरिंगनंतर तृप्ती भट्ट यांनी 2013 साली पहिल्याच प्रयत्नात यूपीएससीमध्ये 165 वी रॅंक मिळवली आणि आयपीएस बनल्या. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर 16 आणि 14 किलोमीटर मॅरेथॉनमध्ये आणि राज्य स्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले. यासोबतच त्या तायक्वांडोमध्येही पारंगत आहेत.
तृप्ती भट्ट यांनी मागच्या 11 वर्षात समृद्ध करणारा अनुभव गाठीशी मिळवला आहे. उत्तराखंडमध्ये आल्यानंतर त्यांना देहरादून एसपीचे पद मिळाले. यानंतर एमपी चामोली, कमांडिंग एसडीआरएफ आणि नंतर एसएसपी टिहरी गढवालची जबाबदारी मिळाली. सध्या त्या देहरादूनच्या एसपी इंटेलिजन्स अॅण्ड सिक्योरीटी पदावर तैनात आहेत.