Sugar Price : सहसा साखरेचा वापर पदार्थांचा गोडवा वाढवण्यासाठी केला जातो. पण, आता हीच साखर खाताना दोनदा विचार करावा लागणार आहे, कारण आहे त्यात सातत्यानं होणारी दरवाढ. ऐन उन्हाळ्यात जिथं लिंबू सरबत, कैरीचं पन्हं किंवा इतर अनेक पदार्थ करताना साखरेला प्राधान्य दिलं जातात त्याचवेळी साखरेचे दर वधारले आहेत. त्यामुळं हीच साखर हिशोबाच्या गणितात कटुता मिसळण्याची चिन्हं आहेत.
मागील दोन आठवड्यांचा आढावा घ्यायचा झाल्यास साखरेच्या दरात सरासरी सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. इतकंच नव्हे, तर येत्या काळातही साखरेचे दर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील साखर उत्पादनात काहीशी घट झाली आहे. साखरेच्या उत्पादनाला अनुसरून असणाऱ्या 2022- 23 या 30 सप्टेंबरपर्यंतच्या वर्षात महाराष्ट्रातून 1.05 कोटी टन साखरेचं उत्पन्न घेतलं जाण्याची शक्यता आहे. याआधी हे प्रमाण 1.37 कोटी टन इतकं होतं. (Sugar Price in Maharashtra)
दरम्यान साखरेच्या दरांमध्ये गेल्या काही दिवसांत प्रती क्विंटल 50 ते 70 रुपयांची वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील आकडेवारीचा आधार घ्यायचा झाल्यास M/30 ग्रेड साखरेचा एक्स मिल दर 3480 ते 3500 रुपये प्रती क्विंटल इतका आहे. तामिळनाडूमध्ये हा दर 3550 ते 3600 रुपये प्रती क्विंटल इतका आहे. तर, कर्नाटकात 3550 रुपये प्रती क्विंटल इतका आहे.
गुजरातमध्ये साखरेचा दर प्रती क्विंटलमागे 3501 ते 3541 रुपये इतका असून, पंजाबमध्ये हे दर 3725 ते 3771 रुपये प्रती क्विंटल इतका आहे. दिल्लीमध्ये साखरेला सर्वाधिक भाव मिळत असून, हे दर 3969 रुपये प्रती क्विंटल इतक्या घरात आहेत.