नवी दिल्ली : रोहान या पाकिस्तानी चिमुरड्यानंतर आणखी एका पाकिस्तानी मुलाला उपचारांसाठी भारतात यायचंय. यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी परदेश मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागितली... आणि सुषमांनी त्यांना उपचारांसाठी मदतीचं आश्वासन दिलंय.
सुषमा स्वराज यांनी या मुलाला आणि त्याच्या कुटुंबीयांना उपचारासाठी भारतात दाखल होण्यासाठी विजा मिळवून देण्याचं आश्वासन दिलंय. बोन मॅरोच्या आजाराशी हा मुलगा लढतोय.
लता सुनील नावाच्या एका महिलेनं एका मुलाला भारतात बोन मॅरोच्या उपचाराची गरज आहे आणि वैद्यकीय मदतीच्या आधारावर त्याला व्हिजा देण्यात यावा, असं ट्विट सुषमा स्वराज यांना केलं होतं. त्यावर उत्तर देताना 'होय आम्ही त्याला व्हिजा देऊ' असं आश्वासन सुषमा स्वराज यांनी दिलंय.
Yes, we will give him visa. @IndiainPakistan https://t.co/rmpOmjfALi
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) August 18, 2017
यापूर्वी, १४ जून रोजी रोहान सिद्दीकी या चार महिन्यांच्या चिमुरड्यावर भारतात यशस्वी हृदय शस्रक्रिया करण्यात आली होती. परंतु, आई-वडिलांसोबत तो पाकिस्तानात परतलेल्या रोहानचा डिहायड्रेशनमुळे मृत्यू झाला. रोहान आणि सिद्दीकी कुटुंबालाही व्हिजा मिळवण्यासाठी सुषमा स्वराज यांची मदत मिळाली होती.