तामिळनाडूचे कृषीमंत्री आर दोराइकन्नू यांचं कोरोनामुळे निधन

दोराइकन्नू १३ ऑक्टोबर रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.    

Updated: Nov 1, 2020, 10:17 AM IST
तामिळनाडूचे कृषीमंत्री आर दोराइकन्नू यांचं कोरोनामुळे निधन title=

चेन्नई : तामिळनाडूचे कृषीमंत्री आर दोराइकन्नू यांचं शनिवारी रात्री निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. कोरोना या धोकादायक विषाणूमुळे त्यांचं निधन झालं आहे. दोराइकन्नू १३ ऑक्टोबर रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. कावेरी रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अरविंदन सेल्वराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ११.१५ मिनिटांनी कृषीमंत्री आर. दोराइकन्नू यांनी अखेरचा श्वास घेतला.

दोराइकन्नू यांना १३ ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यानंतर त्यांच्या उपचारास सुरूवात झाली. अस्वस्थतेच्या तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी देखील दोराइकन्नू यांच्या मृत्यूनंतर दु:ख व्यक्त केलं. ते म्हणाले,'आर दोराइकन्नू हे त्यांच्या साधेपणा, नम्रता, शासन कौशल्य आणि शेतकरी समुदायाच्या हितासाठी कायम प्रयत्नशिल होते.'

त्यांचं निधन म्हणजे तामिळ जनतेचं न भरून येणारं नुकसान असं म्हणत राज्यपालांनी  दोराइकन्नू यांना श्रद्धांजली वाहिली. कृषिमंत्री आर दोराइकन्नू तंजावूर जिल्ह्याच्या पापनासम विधानसभा मतदार संघातून २००६, २०११ आणि २०१६ मध्ये निवडूण आले होते. २०१६ मध्ये दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले होते.