मुंबई : Tata Group Stocks : शेअर बाजारातील चढ-उतारांच्या दरम्यानही, असे अनेक शेअर्स आहेत, ज्यामध्ये तेजी कायम आहे. असाच एक शेअर म्हणजे टायटन होय. टाटा समूहाचा हा शेअर गेल्या एका महिन्यात 12 टक्क्यांहून अधिक वधारला आहे. सोमवारी, 21 मार्च रोजी, शेअरने 2767.55 रुपयांवर उसळी मारली. तेव्हाच शेअरने 52 आठवड्यांचा नवीन विक्रम गाठला. यापूर्वी, 17 मार्च रोजी शेअरने 2720 चा नवा उच्चांक गाठला होता. या शेअरवर ब्रोकरेज हाऊस अद्यापही बुलिश आहेत. ब्रोकरेज रिसर्च फर्म मोतीलाल ओसवालने टायटन स्टॉकमधील गुंतवणूकीचा सल्ला कायम ठेवला आहे.
ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवालने दिलेल्या माहिती नुसार, डिस्क्रेशनरी कंजम्पशनरी स्पेसमध्ये शेअर अद्यापही टॉप पिक बनला आहे. टायटनमध्ये मजबूत ग्रोथ मोमेंटम आहे. कंपनीचा मार्केट शेअर देखील उत्तम आहे. हा शेअर अद्यापही दीर्घ गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय आहे. मोतीलाल ओसवालने या शेअरसाठी 2950 रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे.
21 मार्च रोजी ट्रेडिंग सेशन दरम्यान, शेअरने 2767.55 रुपयांचा रेकॉर्ड हाय बनवला होता. या शेअरमध्ये अद्यापही 9-10 टक्क्यांची तेजी दिसू शकते. गेल्या एका वर्षातील रेकॉर्ड पाहिला तर शेअरमध्ये तब्बल 90 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे.
टाटा ग्रुपची कंपनी टायटनमध्ये दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनीदेखील गुंतवणूक केली आहे. डिसेंबर 2021 च्या तिमाहीतील आकडेवारीनुसार राकेश झुनझुनवाला यांची टायटनमध्ये 5.1 टक्के होल्डिंग होती. 21 मार्च 2022 रोजी त्याची वॅल्यू 12,480 कोटी रुपये होती. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे 37 शेअर आहेत. ज्यांचे नेटवर्थ 33,997.9 कोटी रुपये आहे.