मुंबई : सध्या टेलीकॉम कंपन्या आपल्या प्रीपेड प्लॅन्समध्ये वाढ करणार असल्याच्या बातम्या येत होत्या. त्यात काही टेलीकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्लॅन्समध्ये आधीच वाढ केली होती. ज्यामुळे ग्राहक नाराज झाले आहेत. परंतु आता ग्राहकांसाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. ज्यामुळे ग्राहकांचा फायदाच होईल. टेलीकॉम रेग्यूलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (TRAI) ने 27 जानेवारी रोजी सर्व दूरसंचार कंपन्यांसाठी काही नवीन आदेश जारी केले आहेत. टेलिकॉम टॅरिफ (66th Amendment) Order 2022 अंतर्गत, TRAI ने असे अनेक निर्णय दिले आहेत, ज्याचा ग्राहकांना खूप फायदा होईल. या आदेशात जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला या बातमीत देणार आहोत.
TRAI च्या टेलिकॉम टेरिफ (66th Amendment) Order 2022 अंतर्गत, सर्व दूरसंचार कंपन्यांना आता आदेश देण्यात आला आहे की, प्रत्येक कंपनीने किमान एक प्लॅन व्हाउचर, एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि एक कॉम्बो व्हाउचर ज्याची वैधता 28 दिवस नसून संपूर्ण 30 दिवसांचे असावे. जर ग्राहकाला या प्लॅन्सचे पुन्हा रिचार्ज करायचे असेल, तर ते सध्याच्या प्लॅनच्या तारखेपासून ते करू शकतात, अशी तरतूद असावी.
काही काळापासून अनेक यूजर्सकडून अशी तक्रार आली होती की, टेलिकॉम कंपन्या एका महिन्यासाठी पूर्ण रिचार्ज देत नाहीत आणि 30 दिवसांऐवजी 28 दिवसांच्या वैधतेसह प्लॅन देतात. त्यामुळे TRAI ला ग्राहकांच्या या तक्रारीकडे लक्ष देणे गरजेचे वाटले. ज्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
टेलिकॉम टॅरिफ (66th Amendment) Order 2022 जारी केल्यानंतर, आता टेलीकॉम कंपन्यांच्या सर्व ग्राहकांना अनेक योजनांचे पर्याय, तसेच प्लॅनमध्ये पूर्ण 30 दिवसांच्या वैधतेचा पर्याय मिळेल. अशा प्रकारे ग्राहक त्यांच्या योजना अधिक हुशारीने निवडू शकतील.