बेंगळुरू, कर्नाटकमधील कॉफी शॉपच्या वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा सापडला. तो टॉयलेट शीटसमोरील डस्टबिनमध्ये लपवून ठेवला होता. धक्कादायक बाब म्हणजे दोन तास यामध्ये रेकॉर्डिंग सुरु होती. एका महिलेला याबाबत कल्पना आल्यावर ही घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी 10 ऑगस्ट बेंगळुरूच्या बीईएल रोडवर असलेल्या 'थर्ड वेव्ह कॉफी आउटलेट'मध्ये घडली आहे.
कॅफेमध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने या घटनेची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. त्या व्यक्तीने सांगितले की, फोन डस्टबिन बॅगमध्ये काळजीपूर्वक लपविला होता. ज्यामध्ये फक्त कॅमेरा दिसत होता. फोन फ्लाइट मोडवर होता, जेणेकरून कॉल किंवा मेसेज आल्यावर कोणत्याही प्रकारचा आवाज येणार नाही.
वॉशरूममध्ये फोन आढळल्यानंतर महिलेने कॅफेच्या कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. हा फोन तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. याप्रकरणी पीडित महिलेच्या मित्राने तक्रार केल्याचे सदाशिवनगर पोलिसांनी सांगितले. यानंतर कॉफी शॉपच्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. आरोपीचे वय सुमारे वीस वर्षे असून तो कर्नाटकातील भद्रावती येथील रहिवासी आहे.
भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 77 (महिलेच्या संमतीशिवाय तिचे खाजगी फोटो पाहणे, कॅप्चर करणे आणि प्रसारित करणे) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यान्वये त्याच्या विरोधात FIR नोंदवण्यात आली आहे.
या घटनेच्या वादानंतर 'थर्ड वेव्ह कॉफी'ने सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. कंपनीने लिहिले- बेंगळुरूमधील आमच्या बीईएल रोड आउटलेटमध्ये घडलेल्या घटनेने आम्ही दु:खी आहोत. थर्ड वेव्ह कॉफीमध्ये आम्ही अशा कृती अजिबात सहन करत नाही. आम्ही आरोपीला तात्काळ बडतर्फ केले आहे.
'थर्ड वेव्ह कॉफी 'ही एक प्रसिद्ध कॉफीची चैन आहे, ज्याचे आउटलेट संपूर्ण भारतात आहेत. कंपनीच्या वेबसाइटनुसार, भारतातील 6 शहरांमध्ये तिचे 90 हून अधिक कॅफे आहेत. 'थर्ड वेव्ह कॉफी'चे एकट्या बेंगळुरूमध्ये 10 आउटलेट आहेत.