नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० आणि ३५ अ रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानमध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापारी करार संपवण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांच्या या निर्णयाने पाकिस्तानमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. भारतातील शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी पाकिस्तानला भारतातून जाणाऱ्या वस्तूंची निर्यात न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय सरकारनेही कस्टम ड्यूटीमध्ये २०० टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये टोमॅटोची किंमत प्रति किलो ३०० रुपयांवर पोहोचली आहे.
पाकिस्तानला सर्वाधिक फळे आणि भाजीपाला पुरवणाऱ्या आझादपूर बाजारपेठेत भारतीय व्यापाऱ्यांनी माल न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. टोमॅटो व्यापार संघाचे अध्यक्ष अशोक कौशिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटारी-वाघा मार्गावरुन पाकिस्तानात दररोज ७५ ते १०० ट्रक टॉमेटो जात होते. मात्र या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी टॉमेटोची निर्यात थांबवली आहे.
अन्य भाजीपाला, फळे, सुती धागे यांचे व्यापारीही या मार्गावरुन व्यापार थांबवत असल्याची माहिती आहे.
व्यापारी संबंध संपवल्याचा परिणाम केवळ टॉमेटोवरच नाही तर बटाटे, कांदे आणि हिरव्या भाज्यांवरही होऊन त्याही महागल्या आहेत.
पाकिस्तानने भारतासोबत व्यापारी संबंध तोडलेच. याशिवाय, भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु असलेली समझौता एक्स्प्रेसही रोखण्याचा निर्णय घेतला. वाघा बॉर्डरवरुन जाणारी दिल्ली-लाहोर बससेवाही स्थगित केली आहे.
इम्रान खान सरकारकडून पाकिस्तानमध्ये भारतीय चित्रपटांच्या स्क्रिनिंगवरही बंदी घालण्यात आली आहे.
पाकिस्तानने १५ ऑगस्ट म्हणजे भारताच्या स्वातंत्रदिनी काळा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पाकिस्तानने तिथे असणाऱ्या भारतीय राजदूतांना मायदेशी जाण्याचे आवाहनही केले आहे.