Tomato Rates: साधारण 200 रुपये किंमत पार केलेल्या टोमॅटोचा तोरा आता उतरलेला दिसतोय. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशभरात टोमॅटोच्या किंमती वाढल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली होती. यानंतर शेतातील टोमॅटो चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. काहींनी तर टोमॅटोच्या रक्षणासाठी सुरक्षा रक्षकाचीही नेमणूक केली होती. सर्वसामान्यांना टोमॅटो कमी दरात मिळावा यासाठी सरकारनेही पुढाकार घेतला होता. आता सर्वांना थकवल्यानंतर टोमॅटो हळुहळू आपल्या पूर्व किंमतीवर येताना दिसत आहे. त्याच्या सध्याच्या दराबद्दल जाणून घेऊया.
टोमॅटोच्या दरात मोठी घट झाली आहे. राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची आवक वाढल्याने गेल्या तीन-चार दिवसांपासून किरकोळ बाजारात टोमॅटोच्या दरात घट झालेली दिसून येत आहे. नाशिक, पुणे, मुंबई बाजार समितीत टोमॅटोची मोठी आवक झाली आहे. येथे125 ते 200 रुपयांवर गेलेले घाऊक बाजारातील दर आता 70 ते 85 रुपयांवर आले आहेत. पुणे बाजार समितीत रविवारी नऊ हजार क्रेटची आवक झाल्याचे सांगितले जात आहे. पुण्याच्या नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील टोमॅटोचे भाव कमी झालेले पाहायला मिळाले.
मागील आठवड्या पाच ते सहा हजार क्रेट टोमॅटोची आवाक झाली होती. तर आता रविवारी मार्केट यार्डामध्ये नऊ हजार क्रेट टोमॅटोची आवक झाली. घाऊक बाजारात एक किलो टोमॅटोसाठी 30 ते 50 रुपये मोजावे लागत होते. याच टोमॅटो खरेदीसाठी मागील आठवड्यात ग्राहकांना किलोमागे 70 ते 100 रुपये मोजावे लागत होते.
राज्यभरात टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्याने भाव मोठ्या प्रमाणावर वाढले होते, अशी माहिती देण्यात आली. सर्वत्र टोमॅटोचे नवीन उत्पादन निघण्यास सुरुवात झाल्याने बाजारात आवक वाढल्याचे शेतकरी सांगतात. ऑगस्टअखेरपर्यंत टोमॅटोची आवक आणखी वाढेल आणि त्यांनतर भाव सर्वसामान्यांच्या आवाक्यात येतील, असे सांगण्यात येत आहे.
नव्याने लागवड केलेला टोमॅटो मार्केटमध्ये आल्याने क्रेट मागे 50 टक्के घट झाल्याचे दिसून आले. कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटो 50 ते 85 रुपये प्रतिकिलो बाजरभावाने विकला जात आहे.
मुसळधार पावसामुळे टॉमेटोचा पुरवठा खंडित झाल्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोच्या किरकोळ किंमती 200 रुपये किलोपर्यंत पोहोचल्या. यानंतर राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ (NCCF) टोमॅटो खरेदी केला.सहकारी संस्था नाफेड आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ (NCCF) यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले होते. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी प्रमुख ग्राहक केंद्रांवर ज्या ठिकाणी टॉमेटोच्या किरकोळ किमती एका महिन्यात राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहेत अशा ठिकाणी कमी किमतीत टोमॅटोचे वितरण करण्यात आले होते.